पाणलोटात पावसाचा जोर वाढला; भंडारदरा धरण ६० टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 10:20 AM2020-08-07T10:20:25+5:302020-08-07T10:21:24+5:30
भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी रात्रभर पावसाचा जोर वाढला. शुक्रवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात घाटघर येथे सुमारे पावणे सात इंच तर रतनवाडी येथे पाच इंचाहून अधिक पावसाची नोंद झाली. यामुळे भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक वाढली. धरणातील पाणीसाठा शुक्रवारी सकाळी सहा वाजता ६० टक्के झाला होता.
राजूर : भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी रात्रभर पावसाचा जोर वाढला. शुक्रवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात घाटघर येथे सुमारे पावणे सात इंच तर रतनवाडी येथे पाच इंचाहून अधिक पावसाची नोंद झाली. यामुळे भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक वाढली. धरणातील पाणीसाठा शुक्रवारी सकाळी सहा वाजता ६० टक्के झाला होता.
मागील दोन दिवसांपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे सातत्य टिकून आहे. त्यातच गुरुवारी रात्री पासून शुक्रवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. घाटघर येथे सकाळी १७० मिलिमीटर तर रतनवाडी येथे १५९ मिलिमीटर, पांजरे येथे १३० मिलिमीटर तर भंडारदरा येथे १२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
दरम्यान, कळसुबाई शिखराच्या पर्वत रांगांतही पावसाचा जोर कायम आहे. त्यातच निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाकी येथे ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वाकी येथील लघु पाटबंधारे तलावावरून सकाळी सहा वाजता १ हजार २२ क्युसेकने पाणी नदीपात्रात झेपावले. यामुळे निळवंडे धरणातील पाणीसाठा शुक्रवारी सकाळी सहा वाजता ५ हजार३५२दशलक्ष घनफूट इतका झाला होता.