नगर जिल्ह्यात पावसाची विश्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 01:05 PM2018-07-28T13:05:54+5:302018-07-28T13:06:31+5:30
गेल्या तीन आठवड्यांपासून अहमदनगर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत.
राहुरी : गेल्या तीन आठवड्यांपासून अहमदनगर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. पुढील आठ दिवस पाऊस लांबल्याचे सांगण्यात येत असून जिल्ह्यात ७१ टक्के पेरण्या झालेल्या आहेत.
पश्चिम बंगाल सागरात कमी दाबाचा पट्टा नसल्याने पाऊस रूसल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. यंदाच्या पावसाळयात नगर जिल्ह्यात १९३ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. खरिपाच्या उभ्या पिकांसाठी पावसाची गरज निर्माण झाली आहे. हवामानातील बदलामुळे पिकांच्या वाढीवर यंदा प्रतिकूल परिणाम झाला आहे. ऊस या पिकाचे गेल्या वर्षी एकरी उत्पादन वाढले होते. यंदा मात्र उसाची वाढ समाधानकारक नसल्याचे चित्र समोर आले आहे.
पिकांवर रोगराई, किडींचा प्रादुर्भाव
ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. कपाशी या पिकावर फुलकिडे, मावा, पांढरी माशी व तुडतुडे या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. नियंत्रणासाठी १५ गॅ्रम अॅसिफे ट व ३ मिली इमिडॅक्लोप्रीड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून हातपंपाने फवारणी करावी, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सांगितले आहे. रस शोषणा-या किडींच्या नियंत्रणासाठी मिश्र पीक, आंतरपीक, सापळा पिके म्हणून मका, चवळी, झेंडूची लागवड करण्याचा सल्ला विद्यापीठाने दिला आहे.
भारत मौसम विज्ञान विभागाच्या अंदाजानुसार अहमदनगर जिल्ह्यात येत्या पाच दिवसात कमाल तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस राहील़ किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील़ कमाल आर्द्रता ७९ ते ८७ टक्के राहील. किमान आर्द्रता ७१ ते ७५ टक्के राहील. वा-याचा ताशी वेग १४ ते १९ किलोमीटर राहील.अशा परिस्थितीमुळे पाऊस लांबण्याची शक्यता आहे. - डॉ. रवींद्र आंधळे, सहयोगी प्राध्यापक, हवामान विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी