पावसामुळे भंडारदरा परिसरात जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:21 AM2021-07-31T04:21:45+5:302021-07-31T04:21:45+5:30

भंडारदरा : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आठवडाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत ...

Rains disrupt life in Bhandardara area | पावसामुळे भंडारदरा परिसरात जनजीवन विस्कळीत

पावसामुळे भंडारदरा परिसरात जनजीवन विस्कळीत

भंडारदरा : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आठवडाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून, मुसळधार पावसामुळे भंडारदरा परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे परिसरातील ओढे, नद्या-नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रचंड प्रमाणात कोसळत असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा वाढत असल्याने भंडारदरा धरणाजवळ असलेल्या अंब्रेला फाॅलमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने पर्यटक गर्दी करू लागले आहेत. पावसाने परिसरातील अनेक आदिवासी शेतकऱ्यांची भातशेती पाण्याखाली गेली आहे. शेतीचे बांधच फुटले असून त्यामध्ये लावलेला भात वाहून गेला आहे. काही गावांमध्ये जनावरे दगावली आहेत. जोरदार पाऊस व वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे काही घरांच्या भिंती पडल्या आहेत. काही ठिकाणी घराची छते उडाली आहेत. साम्रद, रतनवाडी, घाटघर, पांजरे या गावांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. बुधवारी पुन्हा एकदा पाणलोट क्षेत्रातील गावांवर वरुणराजाने वर्षाव केल्याने घाटघर येथे सात इंच पाऊस पडला, तर रतनवाडी येथेही साडेसहा इंच पावसाची नोंद झाली.

परिसरातील उडदावणेची नदी, घाटघरची काळू नदी, रतनगडातून उगम पावणारी प्रवरा नदी, पांजरे येथील धामणओहळ पुलावरून दीड ते दोन फूट धोक्याच्या पातळीवरून वाहत होती. यावेळी वन विभागाचे सहायक वनरक्षक गणेश रणदिवे, आरएफओ अमोल आडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून वाहतुकीवर नियंत्रण मिळविले. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या होत्या. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी पाणी कमी होताच वाहतुकीस परवानगी दिली.

......................

२४ तासांतील पाऊस

गत २४ तासांत भंडारदरा येथे १६९ मि.मी. पावसाची नोंद झाली. घाटघर येथे १८० मि.मी., रतनवाडी येथे १७० मि.मी., तर पांजरे येथे १७२ मि.मी. पावसाची नोंद झाली. वाकी येथे १५९ मि.मी. पावसाची नोंद झाली. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा वाढत असून पाणीसाठा ८० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. कळसूबाई शिखराच्या परिसरातही पावसामुळे ओढे-नाले वाहत आहेत. कृष्णावंती नदीच्या वाकी धरणावरून १५७४ क्युसेकने पाणी वाहत आहे.

...........................

भंडारदऱ्यातून ५०२ क्युसेकने विसर्ग

गुरुवारी सकाळी दहा वाजता अंब्रेला धबधब्यातून प्रवरा नदीमध्ये ५०२ क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ८८५१ दलघमी झाला आहे.

.............

भंडारदरा धरण पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने जलाशय परिचलन सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी भंडारदरा धरणाच्या २०० व्हॅाल्व्हमधून अंब्रेला फॉलद्वारे ४१३ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेल्या अंब्रेला फॉलचा पर्यटकांनी सर्व नियम पाळून आनंद घ्यावा.

- गणेश नान्नोर, जलसंपदा विभाग

Web Title: Rains disrupt life in Bhandardara area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.