कोपरगावातील बाजार ओट्याच्या तळावर साचते पावसाचे पाणी; दोन कोटींचा खर्च पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 04:44 PM2020-06-27T16:44:54+5:302020-06-27T16:46:08+5:30
कोपरगाव नगरपरिषदेने भाजीपाला विक्रीसाठी शहरातील बाजारतळ परिसरात ३२ गुंठ्यात अद्ययावत शेडसह आठवडे बाजार ओट्यांची निर्मिती केली. या कामासाठी १ कोटी ८९ लाख रुपये खर्च केला गेला.
रोहित टेके ।
कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेने भाजीपाला विक्रीसाठी शहरातील बाजारतळ परिसरात ३२ गुंठ्यात अद्ययावत शेडसह आठवडे बाजार ओट्यांची निर्मिती केली. या कामासाठी १ कोटी ८९ लाख रुपये खर्च केला गेला.
ओट्यांना आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव देण्यात आले. मात्र ओट्याच्या तळावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे. विशेष म्हणजे या कामाचे सर्व देयक दिले असल्याचेही समजते आहे.
नगरपरिषदेने या बाजार ओट्यांचे २ हजार २०० चौरस फुटाचे काम डिसेंबर २०१७ मध्ये काम सुरु करून जून २०१९ मध्ये पूर्ण केले. त्यात १५ बाजार ओट्यांच्या शेडची निर्मिती केली. यातील ओट्यांची अंदाजे ३३४ इतकी संख्या आहे. गेली अनेक महिने हे ओटे धूळखात पडून होते. परंतु कोरोनामुळे हे बाजार ओटे सुरु करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत पावसाळा सुरु झाल्याने या सर्वच बाजार ओट्याच्या दोन शेडच्या मधोमध सिमेंट कॉन्क्रिट केले आहे. लहान मुले अक्षरश: जलतरण तलावासारखा आनंद घेत आहेत.
ही कोणती व्यवस्था
एकंदरीतच शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च करून विकास कामे केली जातात. कामे सुरु असताना कामावर व्यवस्थित लक्ष न दिल्याने कामे निकृष्ट होतात. आणि त्याच झालेल्या कामावर दुरुस्तीसाठी पुन्हा जनतेच्या खिशातील करापोटी वसूल केलेला पैसा खर्च करायचा ही कोणती व्यवस्था ?, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
नगरपरिषद प्रशासनाचे कामात दुर्लक्षच ..
४बाजार ओटे परिसरातील हे सिमेंट कॉक्रींटचे काम करताना त्याची ट्यूब लेवल काढून त्यावर पाणी साचू नये. यासाठी योग्य तो ढाळ काढायचा असतो. परंतु या कामात कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रशासनाने यात दुर्लक्षच केले. त्याचे कारण सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचते आहे. त्यावरून लक्षात येते,असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.