#MeToo: अत्याचार होतो, त्याचवेळी का आवाज उठवत नाही?- सिंधुताई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 12:39 PM2018-10-22T12:39:43+5:302018-10-22T12:41:28+5:30
अत्याचाराबद्दल 10 वर्षानंतर आरोप करणं चुकीचं
अहमदनगर: सध्या देशभरात #MeToo मोहिमेनं जोर धरला आहे. अनेक क्षेत्रातील महिला या मोहिमेच्या माध्यमातून त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडत आहेत. मात्र या अभियानाबद्दल अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सपकाळ यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ज्यावेळी अत्याचार झाला, त्याचवेळी या महिला का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यात एका पतसंस्थेच्या वर्धापन दिनाला सिंधुताई उपस्थि होत्या. त्यावेळी त्यांना मी टू अभियानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला ज्या वेळी अन्याय होतो, त्याचवेळी आवाज उठवला जावा, असं आवाहन त्यांनी केलं. एखादी घटना घडून गेल्यावर 10 वर्षांनंतर आरोप करणं चुकीचं आहे. काळजात कळ उठते, तेव्हा माणूस गप्प राहू शकत नाही. त्यामुळे जेव्हा अत्याचार झाला, तेव्हाच आवाज का उठवत नाही?, असा प्रश्न त्यांनी विचारला.
या प्रकरणांमुळे दोषी नसलेल्या व्यक्तींनादेखील शिक्षा भोगावी लागत आहे. आरोप करणारी महिला ही कोणाची तरी पत्नी, बहिण आणि आई आहे. तसंच ज्याच्यावर आरोप केले जातात, तोसुद्धा कोणाचा तरी मुलगा, भाऊ आणि वडील आहे, असं सिंधुताईंनी म्हटलं. अत्याचारासाठी शिक्षा ठरलेली आहे. त्यामुळे महिलांनी योग्य वेळी आवाज उठवावा, असं आवाहन त्यांनी केलं.