रिमांड होमच्या जागेवरील आरक्षण उठविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:21 AM2021-03-31T04:21:38+5:302021-03-31T04:21:38+5:30

पालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा मंगळवारी गदारोळात पार पडली. यावेळी आवाजात वारंवार अडथळे आल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे आपले म्हणणे मांडता ...

Raised the reservation at the place of remand home | रिमांड होमच्या जागेवरील आरक्षण उठविले

रिमांड होमच्या जागेवरील आरक्षण उठविले

पालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा मंगळवारी गदारोळात पार पडली. यावेळी आवाजात वारंवार अडथळे आल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे आपले म्हणणे मांडता आले नाही, असा आरोप काही नगरसेवकांनी केला. नगराध्यक्षा अनुराधा आदिक व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी पालिकेत बसून तर नगरसेवकांनी मात्र घरातूनच चर्चेत सहभाग घेतला.

संगमनेर रस्त्यावरील रिमांड होमच्या जागेचे आरक्षण उठविण्याचा विषय चर्चेला येताच त्यावर वाद झाला. व्यापारी संकुलाकरिता आरक्षित असलेल्या जागेवरील आरक्षण उठविण्याचा ठराव घेण्यात आला; मात्र विरोधकांनी त्यास विरोध नोंदविला.

नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष ससाणे, ज्येष्ठ नगरसेवक अंजूम शेख यांनी या चर्चेत भाग घेतला. या जागेचा मूळ मालक कोण? तसेच रिमांड होम हा सरकारी उपक्रम आहे की धर्मादाय संस्था असा प्रश्न ससाणे यांनी उपस्थित केला. पालिकेला आरक्षणात बदल करण्याचा अधिकार नाही असे ते म्हणाले. अंजूम शेख यांनी मात्र सभागृहाने त्यावर निर्णय घेण्याचे सूचित केले.

आमदार लहू कानडे यांनी शहरात दोन कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांना मंजुरी दिली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी त्याला ना हरकत पत्र दिले आहे. या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. असे असताना पालिकेकडून याच रस्त्यांवर निधी खर्च करण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला; मात्र या कामांचे टप्पे पाडण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा आदिक यांनी दिली.

शहरात एलईडी दिवे बसविण्याच्या विषयावर वादावादी झाली. दिव्यांची देखभाल दुरुस्ती व वीज बिलाच्या खर्चाला यावेळी मंजुरी देण्यात आली.

दरम्यान, नगरसेविका स्नेहल खोरे यांनी विरोधकांचे माईक जाणीवपूर्वक बंद करण्यात आल्याचा आरोप केला. कोणतीही माहिती न देता आर्थिक विषयांना मंजुरी देण्यात आल्याचे खोरे यांनी सांगितले.

----------

साठवण तलावात मासे

पालिकेच्या साठवण तलावात मासे सोडण्याचा ठराव विषयपत्रिकेवर घेण्यात आला होता; मात्र तलावावर पालिकेची पर्याप्त सुरक्षाव्यवस्था नाही. तसेच मासे सोडल्याने पाणी शुद्ध होईल याची कोणतीही शाश्वती नाही असा आक्षेप विरोधकांनी नोंदविला. त्यामुळे हा विषय स्थगित ठेवण्यात आला.

-------

Web Title: Raised the reservation at the place of remand home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.