शेती उत्पन्नात विसापूर कारागृह राज्यात दुसरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 08:37 PM2018-04-15T20:37:14+5:302018-04-16T10:39:52+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहाने शेती उत्पन्नात राज्यात दुसरा तर पश्चिम विभागात पहिला क्रमांक पटकावला आहे. कैदी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारागृहाची ७५ एकर शेती फुलवली आहे.
नानासाहेब जठार
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहाने शेती उत्पन्नात राज्यात दुसरा तर पश्चिम विभागात पहिला क्रमांक पटकावला आहे. कैदी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारागृहाची ७५ एकर शेती फुलवली आहे.
कारागृहाने सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ६१ लाख ४० हजार ९८६ रुपयांच्या शेती उत्पन्नातून शासनाला महसूल मिळवून दिला. कारागृहाचा दर्जा २०१३ पासून खुले कारागृहाचा झाल्यापासून शेतीची प्रगती झाली आहे. सध्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले १०९ कैदी आहेत. अधिक्षक दत्तात्रय गावडे, तुरुंगाधिकारी बाळकृष्ण जासुद, आर.पी.पवार व ५५ कर्मचारी कार्यरत आहेत.
गहू, ज्वारी,बाजरी व तूर या पिकांबरोबरच उसाचे पीक घेतले जाते. भाजीपाल्यात कांदा, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, बटाटा, वांगी, कारली, दोडका, डांगर व दुधी भोपळा या फळ भाज्यांबरोबरच मेथी, पालक या पालेभाज्यांची पिके घेतली जातात. कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. कारागृहात पिकवलेले धान्य व भाजीपाला नगर, येरवडा, भायखळा, अर्थररोड (नाशिक) येथील कारागृहांना पुरवला जातो. कारागृहाचे एक ते दहा नंबरचे शेतीचे मळे आहेत. त्याप्रत्येक मळ्यात देखरेखीसाठी कर्मचारी नेमले आहेत. यामध्ये विजय खराडे, सुधाकर तमेवार, अण्णासाहेब भंगड, देविदास पाखरे,बाळासाहेब गेंड यांचा समावेश आहे. शेतीबरोबरच पूरक व्यवसाय म्हणून कारागृहाने वाशिंग सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी प्रमोद डहाळे यांच्या देखरेखीखाली वाशिंग सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आहे.
कारागृहात दुुग्ध, शेळीपालन, कुक्कुटपालन व्यवसाय
कारागृहात दुधासाठी गायी, शेतीसाठी बैल अशी एकूण १३५ लहान, मोठी जनावरे आहेत. या जनावरांचा चारण्यासाठी स्वतंत्र कैद्याची गुराखी म्हणून नेमणूक आहे. शेळी पालनात ७५ शेळी व बोकड आहेत. शेळ्या चारण्यासाठी कैद्याची नेमणूक आहे. कुक्कुट पालन व्यवसायही केला जातो. यामध्ये १२० कोंबड्या आहेत. कारागृहास सध्या कृषी सहाय्यक नाही. परंतु अधीक्षक दत्तात्रय गावडे कृषी पदवी धारक असल्याने ते स्वत: शेतीची देखरेख करतात.
कारागृहात काम करण्या-या कुशल कैद्यांना ६१ रुपये, अर्धकुशल कैद्यांना ५५ रुपये तर अकुशल कैद्यांना ५० रुपये रोजंदारी प्रमाणे मेहनताना दिला जातो. त्यामुळे सजा भोगत असतानाही ते त्यांचे कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतात. - बाळकृष्ण जासुद, तुरुंगाधिकारी
पालकमंत्री राम शिंदे यांच्या सहकार्याने व जिल्हाधिकाºयांच्या नाविन्यपूर्ण योजनेतून रस्त्यासाठी १४.७० लाख निधी मंजूर झाला आहे. या निधीतून विसापुरच्या मुख्य रस्त्यापासून कारागृहाच्या आत बराकीपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. -दत्तात्रय गावडे, अधिक्षक, विसापुर खुले जिल्हा कारागृह.