बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे दुर्घटना, सात दिवसात चौकशी पूर्ण करणार: राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 08:21 PM2021-11-07T20:21:37+5:302021-11-07T20:22:40+5:30

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेले आहेत.

rajesh tope says accident due to delay of construction department inquiry will be completed in seven days | बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे दुर्घटना, सात दिवसात चौकशी पूर्ण करणार: राजेश टोपे

बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे दुर्घटना, सात दिवसात चौकशी पूर्ण करणार: राजेश टोपे

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेले आहेत. त्या इमारतीमध्ये आगरोधक यंत्रणा बसविणे, त्याला तांत्रिक मान्यता देणे, निधी उपलब्ध करणे ही त्यांचीच जबाबदारी आहे. याबाबत बांधकाम विभागाने दिरंगाई केली. त्यामुळेच जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आगरोधक यंत्रणा बसविता आली नाही, अशी माहिती देत यासाठी सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार असल्याचा अप्रत्यक्ष आरोप आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना केला.

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीमुळे शनिवारी ११ जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. मंत्री टोपे यांनी रविवारी जळालेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली. त्यांच्यासमवेत आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्रदीपकुमार व्यास, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार संग्राम जगताप आदी उपस्थित होते. यावेळी टोपे म्हणाले, २०१७-१९ मध्ये इमारतीचे बांधकाम झाले आहे. त्यात कोरोनाच्या काळात तळमजल्यावर अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला होता. आगरोधक यंत्रांच्या तांत्रिक मंजुरीसाठी आरोग्य विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला, मात्र त्यासाठी मंजुरी मिळाली नाही की निधीही मिळाला नाही. रुग्णालयांमध्ये आगरोधक यंत्रणा बसविण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचा निधी यासाठी द्यावा, असेही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आपण मागणी केली होती. 

इलेक्ट्रीकल ऑडिटसाठी ७ लाख ५० हजार, फायर सेफ्टी ऑडिटप्रमाणे सयंत्र बसविण्यासाठी २ कोटी ६० लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून बांधकाम विभागाकडे पाठविले होते. मात्र त्याला अद्याप मंजुरी मिळाली नाही. आग लागण्याचे प्राथमिक कारण हे शार्ट सर्किटच आहे. सात दिवसात त्याचा अहवाल येईल. त्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

आठ जणांचा गुदमरून, ३ जणांचा जळून मृत्यू

अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये सहा जणांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला, तर ३ रुग्णांचा मृत्यू जळून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे, अशी माहितीही मंत्री टोपे यांनी दिली. दोन रुग्णांचा मृत्यू हा जळणे आणि गुदमरणे अशा दोन्ही कारणांनी झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. आग नेमकी कुठून लागली, हे चौकशीत आणि सीसीटीव्ही फुटेजमधून समोर येईल, असेही टोपे म्हणाले.

आगीच्या दुर्घटनेची चौकशी तात्काळ करा-नीलम गोऱ्हे

जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर येथील आगीची घटना ही अत्यंत दुर्दैवी घटना असून या घटनेने मला तीव्र दुःख झाले आहे. या दुर्घटनेसाठी नेमलेल्या चौकशी समितीने तात्काळ चौकशी पूर्ण करावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी अधिकाऱ्यांना दिले. आगी संदर्भात त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी राजेश टोपे यांनी घटनास्थळी भेट दिली.
 

Web Title: rajesh tope says accident due to delay of construction department inquiry will be completed in seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.