चारा छावण्यांमध्ये बालकांची सुरक्षा रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:47 AM2019-05-22T11:47:45+5:302019-05-22T11:48:17+5:30
जामखेड तालुक्यातील हळगाव परिसरातील काही चारा छावण्यांमध्ये जनावरांसाठी चाऱ्याची कुट्टी करणाºया इलेक्ट्रॉनिक यंत्रांवर सर्रास लहान मुले वावरताना दिसत आहेत.
सत्तार शेख
हळगाव : जामखेड तालुक्यातील हळगाव परिसरातील काही चारा छावण्यांमध्ये जनावरांसाठी चाऱ्याची कुट्टी करणाºया इलेक्ट्रॉनिक यंत्रांवर सर्रास लहान मुले वावरताना दिसत आहेत. चारा छावणी चालकांसह पशुपालकांकडून लहान मुलांच्या सुरक्षेला धाब्यावर बसविले जात आहे. त्यामुळे छावण्यांवरील लहान मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
परिसरातील हळगाव, पिंपरखेड, आघी, चोंडी, फक्राबाद, खांडवी, बावी, जवळा, कवडगाव, गिरवली आदी गावांमध्ये सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सरकारने चारा छावण्या सुरू केल्या आहेत. जनावरांसाठी सरकारने ठरवून दिलेल्या नियमानुसार हिरवा चारा व पशुखाद्य देण्यात अनेक छावण्यांमध्ये दुजाभाव केला जात असल्याचे चित्र आहे. छावणीचालकांच्या गोटातील मोजक्या पशुपालकांना नियमाप्रमाणे तर इतरांना कमी चारा दिला जात असल्याचे अनेक शेतकरी खासगीत सांगत आहेत. थेट तक्रार केल्यास संबंधित शेतकºयास छावणी चालकांकडून दमबाजी केली जात असल्याने होणारा अन्याय सहन करण्याची दुर्देवी वेळ पशुपालकांवर आली आहे.
हळगाव परिसरातील एका छावणीत रणरणत्या उन्हात एक अल्पवयीन मुलगा उसाची वाहतूक करून हा ऊस चारा कुट्टी यंत्रात टाकताना दिसला. लहान मुलांचा छावणीतील कुट्टी यंत्रांवर कुट्टी करण्यासाठी वापर होत असल्याचे यानिमित्ताने उघड झाले. विजेवरील या यंत्रांवर लहान मुलांचा वापर होत असल्याने या चिमुकल्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हळगाव परिसरासह तालुक्यात सध्या उष्णतेची लाट कायम आहे. अंग भाजून काढणाºया जीवघेण्या वातावरणात लहान मुलांच्या सुरक्षेला खुलेआमपणे धाब्यावर बसविले जात आहे.
छावणीतील जनावरांची निगा राखण्यासाठी काही पशुपालक आपल्या लहान मुलांना छावण्यांमध्ये पाठवित आहेत. अनेक छावण्यांमध्ये आकडे टाकून वीज घेतली जात असताना त्याभोवती ही मुले छावणीत मुक्तसंचार करीत आहेत. लहान मुले कडबा कुट्टीवर आपल्या जनावरांना मिळालेल्या चाºयाची कुट्टी करून घेण्यासाठी जातात.
छावणीचालकही लहान मुलांना रोखत नाहीत. याशिवायपशुपालकही आपल्या लहान मुलांच्या जीवाची काळजी करताना दिसत नाहीत. यावरून छावण्यांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसत आहे.