शिर्डीत राम नवमीला गर्दी, साई चरणी ३ दिवसांत एवढ्या कोटींचं दान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 03:40 PM2023-04-02T15:40:43+5:302023-04-02T16:04:21+5:30
देशातील कोविड महामारीच्या संकटानंतर पुन्हा साई दरबारी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
मुंबई/शिर्डी - देशभरात राम नवमीचा उत्साह पाहायला मिळाला. यंदाची राम नवमी धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. अयोध्येत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. तर, महाराष्ट्रातील नागपूर, नाशिक, सातारा, शिर्डी, शेगाव, मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. शिर्डीतील साई मंदिरातही मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला आले होते.
देशातील कोविड महामारीच्या संकटानंतर पुन्हा साई दरबारी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. त्याच गर्दीतील भक्तांकडून साईचरणी इच्छादान करण्यात येतंय. २०२२ च्या रेकॉर्डब्रेक देणगीनंतर २०२३ च्या सुरुवातीलाच नववर्षांच्या पहिल्या दिनीही भाविकांनी दान करत साईचरणी सेवा दिली. हैदराबाद येथील साईभक्त राजेश्वर यांनी साईबाबांना तब्बल एक कोटी रुपयांची देणगी दिली होती. नववर्षाच्या पहिल्या दिवसानंतर आता, राम नवमीच्या निमित्ताने साई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे, या कालावधीत दानपेटीतही मोठी रक्कम जमा झालीय.
साई चरणी अवघ्या ३ दिवसांत ४ कोटी ९ लाख रुपयांचे दान भाविकांनी अर्पण केलंय. संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी याबाबत माहिती दिली. त्यामध्ये, विविध माध्यमातून हे दान भाविकांनी केलंय. त्यानुसार, दान पेटीतून १ कोटी ८१ लाख ८२ हजार १३६ रुपये, देणगी काऊंटरद्वारे ७६ लाख १८ हजार १४३ आणि ऑनलाईन स्वरुपातही भक्तांनी देणगी दिली आहे. राम नवमीनिमित्त अंदाजे २ लाख भाविकांनी साई चरणी येऊन दर्शन घेतले.
दरम्यान, साई मंदिरात पहाटे काकड आरतीपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या होत्या. तसेच, इतरही भाविकांची मोठी गर्दी होती. गेल्या ३ दिवसांत अंदाजे २ लाख भाविकांनी साई-मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. याच काळात भक्तांकडून साईचरणी देणगी स्वरुपात दानही अर्पण करण्यात आलंय.