विश्वासघातकी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : राम शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 01:56 PM2020-02-26T13:56:09+5:302020-02-26T13:56:19+5:30
यावेळी त्यांनी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा निशाणा साधला.
अहमदनगर ( जामखेड ) : शेतकरी कर्जमाफी आणि महिलांवर वाढत्या अत्याचारांच्या घटनांवरून भाजपच्यावतीने मंगळवारी राज्यभरात आंदोलने करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे करण्यात आलेल्या आंदोलनाला भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी उपस्थिती लावत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. विश्वासघातकी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
राम शिंदे पुढे म्हणाले की, सातबारा कोरा करू असे शेतकऱ्यांच्या बांधावर सांगितले. परंतु तो शब्द पाळला नाही. उलट घाईगडबडीत केलेल्या कर्जमाफीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे अशा सरकारचा जाहीर निषेध करून भाजप राज्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून सरकारची निष्क्रियता दाखवून देत असल्याचे राम शिंदे म्हणाले.
तर यावेळी त्यांनी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. तत्कालीन सरकारने घेतलेले निर्णयाला या सरकारने स्थगिती देण्याचा धडाका लावला असून, हे स्थगिती सरकार असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.