लोकसभेसाठी भाजपकडून राम शिंदे, मोनिका राजळे, बबनराव पाचपुते कि दिलीप गांधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:14 PM2018-07-21T12:14:20+5:302018-07-21T12:31:42+5:30
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे दिलीप गांधी हे खासदार असताना आगामी लोकसभेसाठी पक्षातून काही अन्य नावांचीही चर्चा आहे.
अहमदनगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे दिलीप गांधी हे खासदार असताना आगामी लोकसभेसाठी पक्षातून काही अन्य नावांचीही चर्चा आहे. त्यासाठी एक सर्वेक्षण करण्यात आल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे हे भाजपचे नगर दक्षिण लोकसभेचे संभाव्य उमेदवार असल्यास काय कौल राहील, याबाबत सर्वेक्षण करण्यात आल्याचे समजते. गांधी यांनीही स्वतंत्र सर्वेक्षण केल्याची माहिती आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज झाला आहे. भाजपकडून गोपनीय पद्धतीने सर्व्हे सुरू आहेत. भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकतो का, याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सर्व्हे करण्यात आला आहे, तर कोणता उमेदवार राहिल्यास भाजपला जास्त फायदा होईल, याचाही सर्वे राष्ट्रीय पातळीवरून करण्यात आला आहे. एका खासगी एजन्सीने महिनाभरापूर्वी हा सर्व्हे पूर्ण केला आहे.
या सर्व्हेत पालकमंत्री प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या नावांचा समावेश असल्याची खात्रीलायक माहिती एका ज्येष्ठ नेत्याने दिली. या सर्र्व्हेमध्ये या तिघांच्या नावांसोबत खासदार दिलीप गांधी यांच्याही नावाचा समावेश होता. मात्र, विद्यमान खासदार असताना पक्षाकडून दुसरी नावे का चर्चेत आणली जात आहेत? याबाबत उत्सुकता लागली आहे.
विखेंना पालकमंत्री गटाचा विरोध
४काही दिवसांपूर्वी भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांचेही नाव खासदारकीच्या उमेदवारीसाठी चर्चेत होते. दक्षिणमधील संभाव्य उमेदवार म्हणून डॉ. सुजय विखे यांचा परिचय आहे. त्यामुळे प्रस्थापित विरुद्ध सामान्य उमेदवार देण्याचा विचार पालकमंत्री राम शिंदे यांच्या गटाने केला होता. त्यामुळेच प्रा. बेरड यांच्या नावाचीही चर्चा होती. यामुळेच जिल्हा परिषदेच्या कारभारावरून विखे- बेरड यांच्यात काही दिवसांपूर्वी कलगीतुरा रंगला होता.
लोकसभा-विधानसभा एकत्र?
लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या हालचाली सध्या सरकारच्या पातळीवर सुरू आहेत. जिल्ह्यात अत्याधुनिक अशा आठ हजार इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स मागविण्यात आल्या आहेत. तसेच राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती घोषित केल्या आहेत. तर दिवाळीपूर्वी सातव्या वेतन आयोगाची घोषणाही होण्याची शक्यता आहे. या काही घोषणा लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुकीचे संकेत देत असल्याचे दिसते. दुसरीकडे पक्षीय पातळीवरही निवडणुकीची मोठी तयारी सुरू आहे.
विखेंचे नाव टाळले
काँगे्रसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्या भाजप प्रवेशाबाबत जिल्ह्यात कायमच चर्चा रंगते़ राधाकृष्ण विखे जरी भाजपात गेले नाही तरी ते भाजपकडून डॉ़ सुजय विखे यांना उमेदवारीसाठी प्रयत्नशील राहतील, असेही आडाखे नगरच्या राजकारणात आखले जात होते़ मात्र, विखे यांच्या प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याने डॉ. विखे यांचे नाव सर्व्हेतून वगळलेले आहे. मात्र ऐनवेळी डॉ. सुजय विखे भाजपात उडी घेण्याची शक्यताही भाजपमधून व्यक्त केली जात आहे.