रामदास आठवलेंच्या रिपाइंत फूट, गायकवाड यांनी केली नव्या पक्षाची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 09:15 PM2018-07-30T21:15:26+5:302018-07-30T21:16:22+5:30
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यासह भाजपावर नाराजी व्यक्त करत रिपब्लिकन पार्टी आफ इंडियाचे प्रदेश सचिव व प्रवक्ते अशोक गायकवाड यांनी पक्षाचा राजीनामा देत युनायटेड रिपब्लिकन पार्टी स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
अहमदनगर : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यासह भाजपावर नाराजी व्यक्त करत रिपब्लिकन पार्टी आफ इंडियाचे प्रदेश सचिव व प्रवक्ते अशोक गायकवाड यांनी पक्षाचा राजीनामा देत युनायटेड रिपब्लिकन पार्टी स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
गायकवाड यांनी सोमवारी पत्रकारपरिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले, तडजोडीच्या राजकारणात रिपाइं पक्ष भाजपाबरोबर गेला. भाजपाने मात्र आंबेडकरी जनतेला काहीच दिले नाही. सत्तेत दहा टक्के वाटा देण्याचे आश्वासन त्यांनी पाळले नाही. केवळ भावनिक राजकारण करून दलित समाजाची गेल्या चार वर्षांपासून फसवणूक सुरू आहे. दलित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. राज्यासह देशात दलितांसह अल्पसंख्याक समाजावर अन्याय सुरू आहे. भाजपाने भीमा कोरेगाव दंगलीत दलित-मराठा समाजात विष पेरण्याचे काम केले. धनगर, मराठा व मुस्लिम आरक्षणांबाबतही केवळ आश्वासन देऊन प्रत्यक्षात काहीच कृती केली नाही. या पक्षात काम करत असताना माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांची गेल्या काही दिवसांपासून घुसमट होत होती. पक्षात राहून सर्वसामान्य जनतेसाठी ठोस काम करता येत नसेल तर तेथे राहणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही़ खुद्द रामदास आठवलेही भाजप सरकारच्या अनेक निर्णयावर नाराज आहेत़ एस्सी, एसटी कायद्याला कमजोर करण्याचा निर्णय घेणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांच्या निवृत्तीनंतर त्यांना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणचे अध्यक्ष म्हणून या सरकारने नियुक्ती दिली़ भाजपाच्या या दलितविरोधी भूमिकेमुळेच पक्ष सोडत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले़ यावेळी विनोद भिंगारदिवे, नाना पाटोळे, दीपक साळवे, यशवंत भांबाळ आदी उपस्थित होते.
पक्षातील दीडशे पदाधिकारी बाहेर पडणार
नाशिक येथे ४ आॅगस्ट रोजी अशोक गायकवाड यांच्यासह इतर समविचारी कार्यकर्ते आणि संघटना एकत्र येऊन ‘युनायटेड रिपब्लिकन’ पक्षाची स्थापना करणार आहेत. यावेळी रिपाइंमधील सुमारे १५० पदाधिकारी बाहेर पडून नवीन पक्षात सहभागी होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
पवारांची भेट-नवे राजकीय समिकरण
रिपाइंमधून बाहेर पडणाऱ्या गायकवाड यांच्यासह काही पदाधिका-यांनी नुकतीच पुणे येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. नवीन युनायटेड रिपब्लिकन पक्ष आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लढविणार आहे. त्यामुळे येणा-या काळात नवीन राजकीय समिकरणे जुळून येण्याची शक्यता आहे.