राहुरीतील तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष रामदास धुमाळ यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 03:45 PM2017-12-12T15:45:39+5:302017-12-12T15:46:46+5:30
येथील डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे जुने नेते रामदास विश्वनाथ पाटील धुमाळ यांचे मंगळवारी (दि़ १२) पुणे येथील खाजगी रूग्णायात निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मुसळवाडी येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राहुरी : येथील डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे जुने नेते रामदास विश्वनाथ पाटील धुमाळ यांचे मंगळवारी (दि़ १२) पुणे येथील खाजगी रूग्णायात निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मुसळवाडी येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
धुमाळ यांचा जन्म १९३८ मध्ये झाला़ जुनी अकरावीपर्यंतचे शिक्षण राहुरी येथील विद्या मंदीर प्रशालेत झाले. शेती व्यवसाय करीत असताना टाकळीमियाँ ग्रामपंचयात व मुसळवाडी ग्रामपंचायत-सोसायटी स्थापन करण्यात त्यांचे योगदान होते. १९६९ मध्ये जागृती मंडळ स्थापन करून प्रस्थापितांना शह देण्यात धुमाळ यशस्वी ठरले.
जिल्हा सुपरवायझींग सोसायटी, ज्ञानेश्वर नागरी पतसंस्था, आयुर्वेद कॉलेज, तंत्रनिकेतन स्थापन करण्यात धुमाळ यांचे योगदान होते. राहुरी पंचायत समितीचे उपसभापती, जिल्हा एस. काँग्रेसचे खजिनदार, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ आदी ठिकाणी धुमाळ यांनी काम पाहिले.
श्री शिवजी शिक्षण प्रसारक मंडळ कारखान्याच्या मालकीचे रहावे म्हणून रामदास पाटील धुमाळ यांनी मोर्चा काढला होता. अखिल भारतीय ऊस उत्पादक परिषदेचे आयोजन केले होते. शेतक-यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी कारावासही भोगला होता.
कृषि, सहकार, राजकीय व धार्मिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल रामदास पाटील धुमाळ यांना दिल्ली येथे राजीव गांधी जयंती निमित्त शिरोमणी पुरस्कार देऊन डॉ. ए. आर. किडवाई यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. मुंबई येथे नासाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ़ निअल किचेटन व्हॅलनर यांच्या हस्ते धुमाळ यांना राष्ट्रीय सन्मान अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले होते.
रामदास धुमाळ यांच्यामागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे़ राहुरी पंचायत समितीचे माजी सभापती सुधीर धुमाळ यांचे ते वडील होत.