भिंगारमध्ये रेमडेसिवीरचा काळा बाजार, दोघांना अटक; डॉक्टर दापत्य फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 10:52 AM2021-04-13T10:52:33+5:302021-04-13T10:53:13+5:30
अहमदनगर: भिंगार शहराजवळ असलेल्या वडारवाडी येथील म्हस्के हॉस्पिटल येथे सोमवारी रात्री पोलीस व अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून रेमडीसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक केली.
अहमदनगर: भिंगार शहराजवळ असलेल्या वडारवाडी येथील म्हस्के हॉस्पिटल येथे सोमवारी रात्री पोलीस व अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून रेमडीसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक केली.
कारवाईदरम्यान 72 हजार 600 रुपयांचा इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला.
प्रसाद दत्तात्रेय अल्हाट (वय 27 रा. टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर) व रोहित अर्जुन पवार (वय 22 रा. साकत ता.नगर) असे अटक केलेल्या दोघांची नावे असून या गुन्ह्यातील डॉ. कौशल्या किशोर म्हस्के व डॉ. किशोर दत्तात्रय म्हस्के (दोघे रा.वडारवाडी, भिंगार) हे फरार झाले आहेत. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी जावेद हुसेन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हस्के हॉस्पिटल येथील कोविड सेंटरमधून रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्यादराने विक्री होत असल्याची माहिती भिंगार पोलिसांना मिळाली होती. माहितीनुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस नाईक राजू सुद्रिक, अडसूळ, मोरे, तावरे यांच्या पथकाने छापा टाकून अन्न औषध प्रशासन अधिकाऱ्यांना माहिती देत ही कारवाई केली.