श्रीरामपूरमध्ये घरफोडी : तलवारीच्या धाकाने लुटले १० लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 01:03 PM2019-05-15T13:03:17+5:302019-05-15T13:03:37+5:30
शहरातील अशोक रेसिडेन्सीच्या समोरील मथुरा विदाराम बालाणी यांच्या बंगल्यावर मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी दरोडा टाकून तलवारीचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे १० लाखाचा ऐवज चोरुन नेला आहे.
श्रीरामपूर : शहरातील अशोक रेसिडेन्सीच्या समोरील मथुरा विदाराम बालाणी यांच्या बंगल्यावर मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी दरोडा टाकून तलवारीचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे १० लाखाचा ऐवज चोरुन नेला आहे.
बंगल्याच्या मागील बाजूच्या किचनच्या रुमच्या खिडकीचे ग्रील्स वाकवून लहान मुलाने किचनमध्ये प्रवेश करुन किचनचे अन्य दोन दरवाजे उघडले. तेथून पाच ते सात चोरटे बंगल्यात घुसले होते. चोरट्यांनी किचनच्या शेजारी दोन रुममध्ये उचकापाचक केली. तेथे त्यांना काही मिळाले नाही. एका रुममध्ये बालाणी यांचा मुलगा चंदन बालाणी, पत्नी विशाखा बालाणी व कन्या रिया बालाणी हे तिघे झोपलेले होते. चोरट्यांनी रिया बालाणीला मारहाण केल्याने ती जागी झाली. चंदन व विशाखा हे आवाजाने जागे झाले असता दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्याला तलवार लावून कपाटांच्या चाव्यांची मागणी केली. चाव्या दिल्यानंतर चोरट्यांनी कपाट उघडून कपाटातील रोख रक्कम रुपये ६० हजार, लॉकरमधील सोने, चांदिचे दागिने, विशाखा हीच्या अंगावरील दागिने व चंदन याच्या हातातील अंगठ्या असे सुमारे तीस तोळे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल व मुलीचा लॅपटॉप चोरुन नेला.
मथुरा बालाणी यांनी रात्री ३ वाजता शहर पोलीस ठाण्यात दूरध्वनीवरुन दरोड्याची माहिती दिली. अप्पर पोलीस अधिक्षक रोहिदास पवार, पोलीस उपअधिक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून घटनेची पाहणी केली. दरोड्याच्या तपासासाठी तातडीने नगरहून श्वानपथक व ठसेतज्ञ पथक बोलाविण्यात आले. श्वानपथकाने डावखर मळ्यातील विहीरीपर्यत माग दाखविला. दरोडेखोर तेथून वाहनामध्ये फरार झाले असावेत असा अंदाज आहे. चंदन बालाणी यांनी दरोड्याच्या घटनेप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फियार्दीवरुन अज्ञात पाच ते सात दरोडेखोरांविरुध्द दरोड्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.