रणरागिणींचे आत्मक्लेश आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2016 11:55 PM2016-08-02T23:55:23+5:302016-08-03T00:15:54+5:30
पारनेर : दोन वर्षे उलटूनही पारनेर तालुक्यातील लोणीमावळा येथील निर्भयावर झालेल्या अत्याचार व खून प्रकरणाचा निवाडा जलदगतीने करावा,
पारनेर : दोन वर्षे उलटूनही पारनेर तालुक्यातील लोणीमावळा येथील निर्भयावर झालेल्या अत्याचार व खून प्रकरणाचा निवाडा जलदगतीने करावा, या प्रमुख मागणीसाठी पारनेर तालुक्यातील शेकडो रणरागिणींनी सोमवारी पारनेर येथे आत्मक्लेष आंदोलन केले.
लोणी मावळा येथील नववीत शिक्षण घेणाऱ्या निर्भयावर अत्याचार करून तिचा खून झाला होता. त्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करून जलदगती न्यायालयात खटला चालविण्याची विनंती केली होती. त्यावरून खटला जलदगती न्यायालयात सुरू आहे तसेच सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम काम पाहत आहेत. परंतु हे प्रकरण जलदगतीने चालवून न्याय द्यावा, या मागणीसाठी सह्याद्री प्रतिष्ठान, पारनेर तालुका पत्रकार संघ, किसान युनियन परिवाराच्यावतीने आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले.
ग्रामीण साहित्यिक संजय कळमकर म्हणाले, सध्याची पिढी सोशल मीडियात हरवली आहे. त्यामुळे ही पिढी सैराट बनत चालली आहे. त्यात आता संस्कारावर गप्पा मारणारे साहित्यिक कुठे आहेत? असा टोला त्यांनी लगावला. बाजार समितीचे माजी सभापती काशीनाथ दाते म्हणाले, लोणी मावळा येथील मुलीवरील अत्याचाराचा प्रकार गंभीर होता. त्याचा निकाल लवकर लागण्यासाठी सह्याद्री परिवाराने घेतलेला पुढाकार योग्य आहे.
जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल झावरे म्हणाले, एखाद्या पीडितेला न्याय लवकर न देणे हा अन्याय असून न्यायालयाने समाजमनाचा विचार करावा.
संयोजक शिवाजी शिर्के म्हणाले, लोणी मावळातील निर्भयाला दोन वर्षांपासून न्याय मिळाला नाही. दोन वर्षांत फक्त दोनवेळा सुनावणी झाली. परंतु जलदगतीऐवजी जास्त धिम्या गतीने न्यायालयात याची सुनावणी असल्याचे सांगितले. आता न्याय लवकर मिळालाच पाहिजे असे त्यांनी सांगितले.
यावेळी पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, पत्रकार शिवाजी शिर्के, डॉ.भास्कर शिरोळे, रामदास भोसले, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अनिकेत औटी, पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वाघमारे, सुरेश पठारे, अर्जुन भालेकर, शैलेंद्र औटी, महिला व बालकल्याण सभापती सुरेखा भालेकर, नगरसेविका शशिकला शेरकर, सुधामती कवाद, बबन कवाद, नागेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र मुळे, नजीर तांबोळी आदी हजर होते. पारनेर शहरात मंगळवारी आंदोलनाचा विषय चर्चिला गेला. (तालुका प्रतिनिधी)
पारनेर येथील आत्मक्लेश आंदोलनात स्नेहल औटी, तृप्ती चेडे, प्रियंका क्षीरसागर, रूपाली दिघे, माधुरी चव्हाण, ज्योती लंके, संगीता चव्हाण या महाविद्यालयीन युवतींनी आक्रमकपणे मुलींवरील अत्याचाराबाबत भूमिका मांडून न्यायासाठी आम्ही दोन वर्षे लढा देत असून न्यायासाठी किती निर्भयांचा बळी जाणार? असा संतप्त सवालही त्यांनी केला. उपसरपंच सुवर्णा शेंडकर व निर्भयाच्या मावशी म्हणाल्या, आम्हाला लवकर न्याय द्या, आता दारूबंदी झाल्याशिवाय असे अत्याचार थांबणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
आत्मक्लेष आंदोलनात पोलीस उपअधिक्षक आनंद भोइटे, प्रांताधिकारी संतोश भोर, तहसीलदार भारती सागरे,पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर आदींनी लोणी मावळा प्रकरण न्यायप्रविष्ठ असून याबाबत सतरा आॅगस्टपासून सुनावणी सुरू होणार असल्याचे सांगितले. तसेच याप्रकरणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले.