दारू अड्ड्यावर रणरागिणींचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:24 AM2021-09-22T04:24:43+5:302021-09-22T04:24:43+5:30
केळीरुम्हवाडी गावात गेल्या दहा वर्षांपूर्वी महिलांनी दारूबंदी केली आहे. मात्र, काही दिवसांपासून अवैध दारू विक्रीला सुरुवात झाली आहे. मंगळवारी ...
केळीरुम्हवाडी गावात गेल्या दहा वर्षांपूर्वी महिलांनी दारूबंदी केली आहे. मात्र, काही दिवसांपासून अवैध दारू विक्रीला सुरुवात झाली आहे. मंगळवारी गावातील मेंगाळवाडी भागातील महिलांनी अवैध दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध एल्गार पुकारत मोर्चाने जाऊन विक्रीसाठी आणलेली दारू पकडली. एका बॅगमध्ये दारू बाटल्या लपवून ठेवलेल्या होत्या. दारूने भरलेल्या बाटल्या महिलांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केल्या. आंदोलक महिलांना तेथील मद्यपी व अवैध दारू विक्री करणाऱ्यांनी धक्काबुक्की केली, तसेच आंदोलनाचे मोबाइलवर शूटिंग घेणारा युवक जनार्दन मेंगाळ या युवकास अवैध दारू विकणाऱ्यांनी मारहाण केली. जखमी जनार्दन काळू मेंगाळ यांच्या फिर्यादीवरून संतू परते, अशोक किसन मेंगाळ, संतोष किसन मेंगाळ, तुकाराम नामदेव भुतांबरे, सर्व रा. केळीरुम्हवाडी या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय शंकर बेंडकोळी व त्याचे साथीदार गावात अवैध दारू विक्री करत असून, गावातील अवैध दारूला पोलिसांनी तात्काळ पायबंद घालावा, अशी मागणी करत गावातील महिलांनी अकोले पोलीस ठाण्यात मोर्चा आणला होता. रमाबाई मेंगाळ, संपदा मेंगाळ, मिलन मेंगाळ, अलका मेंगाळ, गिरजाबाई मेंगाळ, सुनीता मेंगाळ, मंगाबाई मेंगाळ, चंदाबाई मेंगाळ, हिराबाई मेंगाळ आदी महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
...................................................
कोट
तालुक्यात अवैध दारू विक्रीवर पोलिसांची करडी नजर असून, अवैध दारूविरुद्ध कारवाया सुरू आहेत. गत महिन्यात केळीरुम्हवाडी येथील अवैध व्यावसायिकांविरोधात केली होती. महिलांच्या तक्रारीवरून पुन्हा कारवाई केली आहे. अवैध दारूला आळा घालण्याचा कसोशीने प्रयत्न सुरू आहे.
-मिथुन घुगे, प्रभारी पोलीस निरीक्षक