श्रीरामपूर तालुक्यातील शेतक-यावर रानडुकराचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 06:53 PM2018-04-18T18:53:51+5:302018-04-18T18:56:59+5:30
तालुक्यातील टाकळीभान येथे उसाच्या शेतात पाणी देत असताना रानडुकराने तरुण शेतक-यावर हल्ला केल्याने तरुण जखमी झाला. या परिसरात बिबट्यांची दहशत कायम असतानाच गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांचाही या परिसरात संचार वाढल्याने शेतकरी चांगलाच धास्तावला आहे.
श्रीरामपूर : तालुक्यातील टाकळीभान येथे उसाच्या शेतात पाणी देत असताना रानडुकराने तरुण शेतक-यावर हल्ला केल्याने तरुण जखमी झाला. या परिसरात बिबट्यांची दहशत कायम असतानाच गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांचाही या परिसरात संचार वाढल्याने शेतकरी चांगलाच धास्तावला आहे.
टाकळीभान येथील तरुण शेतकरी उमेश भास्करराव त्रिभूवन हे रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात उभ्या असलेल्या तोडणीस आलेल्या उसाला पाणी देण्यासाठी गेले होते. पाणी भरण्यासाठी कोरड्या उसाला बारे देत होते. अचानक आवाज ऐकून जवळच उसाच्या शेतात लपून बसलेले रानडुक्कर त्रिभुवन यांच्या दिशेने पळत आले. काही समजण्याच्या आतच क्षणात त्रिभुवन यांना जोराची धडक दिली. या आघाताने गोंधळलेले त्रिभुवन यांनी जिवाच्या आकांताने आरडाओरड सुरु केली. उसाच्या शेतातून आरडाओरडीचा आवाज ऐकून शेजारी काम करीत असलेले त्यांचे चुलत बंधू व इतरांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. रानडुकरालाही कोणीतरी येत असल्याची चाहूल लागल्याने त्याने घटनास्थळावरुन धूम ठोकली. शेजारी काम करीत असलेले सुनील त्रिभुवन व इतर घटनास्थळी पोहोचताच त्यांनी उमेश त्रिभुवन यांना चिखलाने माखलेल्या अवस्थेत पाहिले. गोंधळलेल्या अवस्थेत उमेश याने झालेला प्रकार सांगितला. उमेश याला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डुकराच्या धडकेने उमेशच्या जबड्याच्या खालच्या बाजूस चांगलीच जखम झाली आहे. रुग्णालयात उपचार करुन उमेशला घरी सोडले आहे.