उख्खलगाव येथे परंपरागत विरोधकांत रंगला सत्तासंघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:15 AM2021-01-10T04:15:40+5:302021-01-10T04:15:40+5:30
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील उख्खलगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत परंपरागत विरोधकांत सत्तासंघर्ष रंगला आहे. कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी साखर कारखान्याचे ...
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील उख्खलगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत परंपरागत विरोधकांत सत्तासंघर्ष रंगला आहे.
कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी साखर कारखान्याचे माजी संचालक सूर्यभान लाकुझोडे यांचे पॅनल व कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी साखर कारखान्याचे माजी संचालक सुभाष वाळके यांच्या पॅनलमध्ये अटीतटीची लढत होत आहे. सूर्यभान लाकुडझोडे हे राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांचे, तर सुभाष वाळके हे भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांचे समर्थक आहेत.
येथे या दोन गटातच आलटूनपालटून ग्रामपंचायतीचे सत्ता समीकरण सुरू आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत लाकुडझोडे गटाचे दोन सदस्य वाळके गटाच्या गळाला लागले. त्यावेळी अनिल ढवळे सरपंच, तर मोहन चंदन यांना उपसरपंच पदाची लॉटरी लागली. या दोघांनीही पाच वर्षे चांगले कामकाज करण्याचा प्रयत्न केला. सरपंच अनिल ढवळे हे यावेळीही प्रभाग दोनमधून निवडणुकीच्या मैदानात आहेत. या ठिकाणी नऊ सदस्यांसाठी निवडणूक होत असून, दोन्ही गटांनी सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचे दावे-प्रतिदावे केले आहेत. मात्र, यापूर्वीचा इतिहास पाहता कोणत्याही गटाला एकतर्फी विजय मिळविता आलेला नाही.