डिजिटल युगातही रांजणी-माथणी ‘आउट ऑफ कव्हरेज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:35 AM2021-02-18T04:35:35+5:302021-02-18T04:35:35+5:30

केडगाव : नगर तालुक्यातील रांजणी-माथणी ही दोन्ही गावे मोबाईलला रेंज मिळत नसल्याने अद्यापही ‘आउट ऑफ कव्हरेज एरिया’त आहे. ...

Ranjani-Mathani 'out of coverage' even in digital age | डिजिटल युगातही रांजणी-माथणी ‘आउट ऑफ कव्हरेज’

डिजिटल युगातही रांजणी-माथणी ‘आउट ऑफ कव्हरेज’

केडगाव : नगर तालुक्यातील रांजणी-माथणी ही दोन्ही गावे मोबाईलला रेंज मिळत नसल्याने अद्यापही ‘आउट ऑफ कव्हरेज एरिया’त आहे. यामुळे ऑनलाईन कामांचा खेळखंडोबा होत असून गावातील शैक्षणिक, शासकीय कामांचा पुरता बोजवारा उडाला.

गर्भगिरीच्या डोंगरात वसलेली रांजणी व माथणी ही दोन जुळी वाटणारी गावे. मोबाईल टॉवर नसल्याने जगाच्या संपर्कापासून खूप दूर आहेत. दोन्ही गावांनी गावरान पद्धतीचा अस्सल खवा तयार करण्यात नावलौकीक मिळविला आहे. येथील खव्याला राज्यभरातून मागणी असते. ग्रामीण नाट्य चळवळीचीशी अतूट नाळ असल्यामुळे येथील कलावंत व त्यांची नाट्यकला अलौकीक आहे. दोन्ही गावात सरासरी दीड ते दोन हजार लोकसंख्या आहे. येथील ६० टक्के गावकरी दुग्ध व्यवसाय, नोकरी, भाजीपाला विक्री, इतर रोजगाराच्या निमित्ताने नगर शहराशी रोज ये-जा करतो. गावात कधीच कोणाचा मोबाईलद्वारे संपर्क होत नाही. वर्षभर शालेय मुलांचे शिक्षणही ऑनलाईन सुरू आहे. यूट्यूब किंवा इतर व्हिडोओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून शाळा बंद असतानाही इतर ठिकाणी मुलांचे शिक्षण अविरत सुरू राहिले. मात्र त्याला ही दोन गावे अपवाद ठरली. इतकेच नाही ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयातून आता ऑनलाईन दाखले मिळण्याची सुविधा राज्य सरकारने राज्यभरात सुरू केली. मात्र या दोन गावात मोबाईलला रेंजच मिळत नसल्याने या सर्व शासकीय सुविधांपासून ही गावे वंचित आहेत. दोन्ही गावातील काही विशिष्ट डोंगरमाथ्यावर थोडीफार रेंज मिळते.

-----

अन‌् अनेकांना जीव गमवावा लागला..

गावात दुग्ध व्यवसाय जोमात असल्याने प्रत्येकाच्या घरापुढे पशुधन आहे. गुरे चारण्यासाठी गेलेल्या काहींना अचानक शारिरीक त्रास होतो. काहींना हृदयविकाराचे झटके येण्याचे गंभीर प्रकार घडले. मात्र अशा संकटात कोणाशी संपर्क न झाल्याने त्यांना नाहक जीव गमावण्याची वेळ आली आहे.

---------

रांजणी गावात मोबाईलला रेंज यावी यासाठी आम्ही ग्रामपंचायतीचा अनेकदा ठराव घेऊन तो जिल्हा प्रशासनाला पाठविला. स्थानिक आमदार, खासदार यांच्या कार्यालयाचे उंबरे झिजविले. इतकेच नाही तर जिओ व बीएसएनएलच्या कार्यालयांना अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र कोणीच याकडे लक्ष दिले नाही.

-बाळासाहेब चेमटे,

सरपंच, रांजणी

------

माथणी गावात सर्वांकडे मोबाईल फोन असूनही रेंज नसल्याने तो कधीच खणखणत नाही. मोबाईल कंपन्यांन्या अनेकदा पत्र दिले. निवेदन दिले. खासदारांकडेही पाठपुरावा केला. मात्र आमची मागणी अद्याप कोणीच गांभीर्याने घेतली नाही.

-महेश वाघ,

माजी उपसरपंच, माथणी

Web Title: Ranjani-Mathani 'out of coverage' even in digital age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.