श्रीगोंद्यातील रणरागिनींनी रोखला बालविवाह; पोलिसांना पाहून व-हाडी मंडळींनी ठोकली धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 08:15 PM2017-12-14T20:15:04+5:302017-12-14T20:17:18+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा नात्यातील मुलाबरोबर होणारा विवाह श्रीगोंद्यातील महिलांनी पोलिसांच्या मदतीने रोखला.
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा नात्यातील मुलाबरोबर होणारा विवाह श्रीगोंद्यातील महिलांनी पोलिसांच्या मदतीने रोखला.
टाकळी कडेवळीत येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला येथील बोरमलनाथ मंदिरात होणार होता. विवाहापूर्वी नव वधू-वरांना हळद लावली. वराची सवाद्य मिरवणूक काढली. नव वधू लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच श्रीगोंदा येथील रणरागिनी पोलिसांना घेऊन लग्नस्थळी पोहचल्या. पोलिसांना पाहून वºहाडी मंडळींनी धूम ठोकली. त्यानंतर नव वधू-वरांच्या आई, वडिलांना यवत पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह करणार नाही, असे लिहून घेत त्यांना सोडून दिले.
अल्पवयीन मुलीच्या भावना विचारात न घेता विवाह निश्चित करण्यात आला. मुहूर्त ठरला़ पाहुण्यांना निमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्या. ही माहिती मिरा शिंदे, अॅड. सुनीता पलिवाल, चांदणी खेतमाळीस, स्मिता साबळे, जयश्री कोंथिबीरे यांना समजली. त्यांनी पोलिसांना घेऊन विवाहस्थळ गाठले़ हा बालविवाह रोखला.
उद्या पासून शाळेत जाणार
टाकळी कडेवळीत येथील ही मुलगी सध्या शिक्षण घेत आहे. वडिलांच्या दबावामुळे शाळा सोडून कपाळाला विवाहाचे बाशिग बांधण्याची वेळ आली होती. पण श्रीगोंद्यातील सतर्क महिलांमुळे तिची सुटका झाली. त्यामुळे मुलींच्या डोळ्यातून आनंदाश्रू तराळले. मी उद्यापासून पुन्हा शाळेत जाणार आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार, असे त्या मुलीने सांगितले.