राशीनला साथीच्या आजारांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:56 PM2018-11-06T12:56:41+5:302018-11-06T12:56:58+5:30
राशीनसह (ता.कर्जत) परिसरात डेंग्यू, गोचीड ताप, स्वाईन फ्ल्यू सदृश आदी साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
राशीन : राशीनसह (ता.कर्जत) परिसरात डेंग्यू, गोचीड ताप, स्वाईन फ्ल्यू सदृश आदी साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. शरिरातील पांढऱ्या पेशी (प्लेटलेट) कमी होणे, जंतुसंसर्गातून (व्हायरल इन्फेक्शन) होणाºया आजारांचेही प्रमाण वाढले आहे. याकडे प्राथमिक आरोग्य कें्रद, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. याकडे ग्रामपंचायत, आरोग्य प्रशासनाने लक्ष न दिल्यास शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राशीन परिसरात साथीच्या विविध आजारांनी थैमान घातले आहे. शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने सर्वसामान्यांनाही खासगी रुग्णालयांचा पर्याय निवडावा लागतो. साथीच्या आजारांमुळे विविध तपासण्या कराव्या लागतात. त्यातून सर्वसामान्यांचे आर्थिक गणितही बिघडते. लहान मुलांतही सर्दी, खोकला व तापाचे प्रमाण वाढत आहे. ग्रामपंचायत स्तरावर धूर फवारणी, सार्वजनिक ठिकाणी जंतूनाशक फवारणी होते. मात्र आरोग्य यंत्रणेमार्फत राबविलेल्या प्राथमिक उपाययोजना त्रोटक स्वरूपात असतात. राशीन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २७ गावे येतात. साथीच्या आजारावर आठवड्यातून एकदा सर्वे केला जातो. या आजाराविषयी कोणत्या उपाययोजना आहेत, याबाबत जनजागृती सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकारी अश्विनी वाल्हे यांनी सांगितले. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा. वैयक्तिक स्वच्छतेबरोबर मच्छरदाणी, लांब कपडे वापरावेत. डास चाऊ नये यासाठी काळजी घ्यावी, लक्षण आढळल्यास रूग्णांनी वेळेत उपचार घेऊन भरपूर पाणी प्यावे, असे त्यांनी सांगितले.
साथीच्या आजाराबाबत वैद्यकीय अधिकारी अश्विनी वाल्हे यांना उपाययोजनेबाबत विचारले असता त्यांनी ग्रामपंचायतीशी काही पत्रव्यवहार झाला नसल्याचे सांगितले. तर ग्रामविकास अधिकारी कैलास तरटे यांनी आरोग्य विभागाशी पत्रव्यवहार झाल्याचे सांगितले. यातून या दोन्ही विभागातील समन्वयाचा अभावच दिसून येतो.
रूग्णांना ताप, डोकेदुखी, सर्दी, खोकला, डोळेदुखी, अंगावर पुरळ येणे, शरिरातील श्वेत पेशी कमी असे आढळल्यास आम्ही केंद्रात रक्त तपासणी करतो. इलाज सुरुच ठेऊन डेंग्यूची लक्षणे आढळल्यास आयजीजीजी, आयजीएम व एन १ एस १ साठी रक्ताचे नमुने नगर सिव्हिलला पाठवतो. - डॉ. अश्विनी वाल्हे, वैद्यकीय अधिकारी, राशीन प्राथमिक आरोग्य केंद्र
प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे सुरू आहे. येथे औषधांचा नेहमीच तुटवडा भासतो. सध्या द्वितीय वर्गाचा वैद्यकीय अधिकारी आहे. पूर्णवेळ प्रथम दर्जाचा अधिकारी द्यावा, अन्यथा आंदोलन करू. -सुभाष जाधव, तालुका समन्वयक, शिवसेना