शारदीय नवरात्र उत्सवासाठी राशीन नगरी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:24 PM2019-09-27T12:24:50+5:302019-09-27T12:24:58+5:30
राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणा-या राशीनच्या येमाई (जगदंबा) देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. रविवारपासून होणा-या घटस्थापना ते कोजागरी पौर्णिमेपर्यंत चालणा-या आंनदोत्सवासाठी राशीन नगरी सज्ज झाली आहे.
राशीन : राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणा-या राशीनच्या येमाई (जगदंबा) देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. रविवारपासून होणा-या घटस्थापना ते कोजागरी पौर्णिमेपर्यंत चालणा-या आंनदोत्सवासाठी राशीन नगरी सज्ज झाली आहे.
हलत्या दीपमाळेसाठी प्रसिध्द असणारे व जागृत, स्वंयभू अशी कर्जत तालुक्यातील राशीनच्या येमाई देवीची ओळख आहे. यंदा देवी मंदिरात रविवारी पारंपरिक पध्दतीने घटस्थापना करण्यात येते. नऊ दिवस महावस्त्रालंकार पूजा, आरती-धुपारती, ललित पंचमी, दुर्गाष्टमी पासोडी पोत, होम-हवन, विजयादशमी पालखी सोहळा, कोजागरी पोर्णिमा भळांदे इत्यादी धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. या आंनदोत्सवानिमित्त मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. मंदिर व शिखरावर आकर्षक विद्युत रोषणाईचे काम सुरू आहे.
मंदिर परिसरातील पूजेच्या साहित्याची दुकाने सजली आहेत. बालगोपालांची मनोरंजनाची साधने, हॉटेल्स, कपड्यांची दुकाने यांची तयारी झाली आहे. यात्राकाळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ, गुरव, पुजारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये दर्शन बारी, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहन पार्किंग व्यवस्था पिण्याचे पाणी, महामंडळाच्या ज्यादा बसेस, अंतर्गत रस्ते तसेच राशीनला जोडणारे राज्यमार्ग येणाºया भाविकांसाठी सुस्थितीत करणे, अतिरिक्त पोलीस बंदोबस्तासह पेट्रोलिंग, वीज व्यवस्था आदी सुविधा देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. भाविकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे.
२९ सप्टेंबरला घटस्थापना. नवरात्र प्रारंभ, २आॅक्टोबरला ललित पंचमी, सुवासिनी हळदी-कुंकु, ६आॅक्टोबला दुर्गाष्टमी पासोडी पोत, ७ आॅक्टोबरला घटोत्थापन नवरात्र सांगता, ८आॅक्टोबरला विजया दशमी, देवीला फुले लावणे, पालखी उत्सव, ९ आॅक्टोबर पालखी उत्सव, १३ आॅक्टोबर कोजागरी पोर्णिमा भळांदे उत्सव, असे कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.