आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा नेवासा फाटा येथे रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 02:14 PM2018-08-07T14:14:45+5:302018-08-07T14:14:55+5:30
मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने नेवासाफाटा येथे आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
नेवासा : मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने नेवासाफाटा येथे आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
मुस्लिम समाजाला हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत मुस्लिम समाजातील रस्त्यावर आले. पोलिसांनी केलेल्या विनंतीनुसार रास्तारोको केल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी निषेध सभा घेतली.यावेळी आंदोलन नेतृत्व करणारे इम्रान दारुवाले म्हणाले, आज मुस्लिम समाज उपेक्षित जीवन जगत आहे. त्यामुळे समाजाचा उत्कर्ष नाही. आमची ही मुले-बाळे अधिकारी व्हावेत. आमचे स्वप्न असल्याने सरकारने अधिक अंत न पाहता मुस्लिम समाजाला हक्काचे आरक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने भूमिका घ्यावी, अशी मागणी करत हे आंदोलन आम्ही शांततेच्या मागार्ने करत असून आमच्या न्यायहक्कासाठी आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन तीव्र करू प्रसंगी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेऊ असा ईशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला.
यावेळी अँड.राजु इनामदार, गफूर बागवान, राजमहंमद शेख, अँड.जमीर शेख, रिपाईचे अशोक गायकवाड, शिवसेनेचे बालेंद्र पोतदार, नेवासा वकील संघाचे अध्यक्ष अँड.वसंत नवले, मराठा महासंघाचे गणेश झगरे, मौलाना जाकिर शेख, अब्बास बागवान, असिर पठाण यांच्यासह सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर यांना देण्यात आले.