विहिरीत सुरु असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2017 04:22 PM2017-05-11T16:22:33+5:302017-05-11T16:22:33+5:30
उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे़ दरम्यान गुरुवारी मन्याळे ग्रामस्थ, शिवसेना, भूमीपुत्र शेतकरी संघटना, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले़
आॅनलाईन लोकमत
अकोले (अहमदनगर), दि़ ११ - तालुक्यातील मन्याळे गावातील भैरवनाथ शंकर जाधव हा शेतकरी आपल्याच शेतातील कोरड्या विहिरी उपोषणला बसला असून या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे़ दरम्यान गुरुवारी मन्याळे ग्रामस्थ, शिवसेना, भूमीपुत्र शेतकरी संघटना, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले़
गुरुवारी दुपारी कोल्हार घोटी राज्य मार्गावर झालेल्या या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. मन्याळे येथील शेतकरी जाधव यांच्या उपोषणावर शुक्रवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत तोडगा न निघाल्यास जिल्हा निबंधक कार्यालयास टाळे ठोकण्याचा व जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट बंद करण्याचा इशारा मराठा महासंघाचे प्रमुख संभाजी दहातोंडे यांनी दिला आहे. शिवसेनेचे सतिष भांगरे, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदिप कडलग, महेश नवले, विनोद हांडे, राज गवांदे यांची भाषणे झाली.
दरम्यान उपोषण थांबवावे यासाठी तहसिलदार यांच्या दालनात रास्तारोको आंदोलन संपण्यापूर्वी दुपारी यशोमंदिर पतपेढीचे अध्यक्ष, संचालक व अधिकारी यांनी तहसीलदार मनोज देशमुख, पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके, सहायक निबंधक कांतीलाल गायकवाड यांच्याशी चर्चा केली. यशोमंदिर पतपेढीचे अध्यक्ष अशोक वाळुंज, संचालक बी. आर. आरोटे, बाबुराव गायकर, भानुदास आरोटे, योगेश आरोटे, शिवाजी फणसे, सरव्यवस्थापक हरिभाऊ गायकर, शाखाधिकारी पांडुरंग गाजरे, दिनकर गायकर, वसुली अधिकारी सुरेश आरोटे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे निलेश तळेकर, मिनानाथ पांडे, भैरवनाथ जाधव यांचे बंधू श्रीधर जाधव, मुलगा योगेश जाधव हे उपस्थित होते. सायंकाळपर्यंत उपोषण प्रश्नी तोडगा निघण्याची शक्यता आहे. शुक्रवारी उपोषण सुरु राहिल्यास ‘आसुड’ शेतकरी संघटनेचे आमदार बच्चु कडू मन्याळे येथे येणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.