Ahmednagar: तरुणांना अमानुष मारहाण प्रकरणी रास्तारोको, आंबेडकरी समाज एकवटला, दोघा आरोपींना अटक
By शिवाजी पवार | Published: August 27, 2023 02:39 PM2023-08-27T14:39:04+5:302023-08-27T14:46:45+5:30
Ahmednagar: हरेगाव येथे कबुतरे व शेळ्या चोरीच्या संशयावरून चार तरुणांना झाडाला उलटे टांगून विवस्त्र करून अमानुषपणे केलेल्या मारहाणीच्या घटनेविरूद्ध आंबेडकरी समाजाने श्रीरामपूर नेवासे राज्यमार्गावर रास्तारोको केला.
- शिवाजी पवार
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) - हरेगाव येथे कबुतरे व शेळ्या चोरीच्या संशयावरून चार तरुणांना झाडाला उलटे टांगून विवस्त्र करून अमानुषपणे केलेल्या मारहाणीच्या घटनेविरूद्ध आंबेडकरी समाजाने श्रीरामपूर नेवासे राज्यमार्गावर रास्तारोको केला. घटनेतील सर्व आरोपींना तत्काळ अटक व कठोर कारवाईची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दोन आरोपींना अटक तसेच आणखी एका दोषीला आरोपी केल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे शुभम माघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड व प्रणय खंडागळे यांना जबर मारहाण करण्यात आली होती. यातील दोघे जण हे अल्पवयीन व दलित समाजातील आहेत. हरेगाव येथील युवराज नानासाहेब गलांडे यांच्या घरासमोरून एक वर्षापूर्वी शेळ्या व कबुतरे चोरी गेली होती. ती या चौघा तरुणांनी चोरल्याचा गलांडे यांना संशय होता. याच संशयावरून गलांडे याच्यासह त्याचे साथीदार मनोज बोडखे, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य व राजू बोरगे (रा.सर्व हरेगाव) या आरोपींनी चौघा तरुणांना गलांडे याच्या शेतावर नेले. तेथे विवस्त्र झाडाला उलटे टांगून तरुणांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती.
या घटनेचे व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर श्रीरामपुरात त्यावर उद्रेक झाला. आंबेडकर संघटनांनी रविवारी हरेगाव फाट्यावर नेवासे महामार्गावर रास्तारोकोची हाक दिली होती. त्यानुसार रविवारी सकाळी ११ वाजता शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी दोन तास रास्तारोको केला. यावेळी गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. आरोपी युवराज गलांडे याचे वडील नानासाहेब गलांडे याला आरोपी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
पीडित चौघा तरुणांवर आरोपींनी लज्जास्पद वर्तन केले. पीडितांवर लघुशंका केली गेली. आरोपींची गावामध्ये गेली अनेक वर्षे दहशत होती. त्यांनी अनेक बेकायदा कृत्य यापूर्वी केले असून नानासाहेब गलांडे याच्यावर १३ गुन्हे दाखल आहेत, असा आरोप करण्यात आला. दरम्यान, पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुंजे, उपअधीक्षक संदीप मिटके यांनी पप्पू पारखे व दीपक गायकवाड या दोघा आरोपींना अटक केल्याची माहिती आंदोलनकर्त्यांना दिली. त्याचबरोबर नानासाहेब गलांडे यालाही गुन्ह्यात आरोपी केल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात सुरेंद्र थोरात, भाजप नेते प्रकाश चित्ते, भिमा बागुल, सुभाष त्रिभूवन, संदीप मगर, सरपंच महेंद्र साळवी, रमादेवी धीवर, विजय खाजेकर, अनिल भनगडे, सचिन बडधे, जोएफ जमादार, चरण त्रिभूवन, राजाभाऊ कापसे, सुनील संसारे, प्रशांत भोसले, अशोक गायकवाड आदी सहभागी झाले होते.