पोटापाण्यासाठी खेडोपाडी धावतेय ‘रसवंती एक्स्प्रेस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:20 AM2021-02-13T04:20:13+5:302021-02-13T04:20:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोधेगाव : बहुतांश व्यावसायिक वेगवेगळ्या कल्पना वापरून आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी धडपडत असतात. अशीच एक नावीण्यपूर्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बोधेगाव : बहुतांश व्यावसायिक वेगवेगळ्या कल्पना वापरून आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी धडपडत असतात. अशीच एक नावीण्यपूर्ण शक्कल लढवून शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील एका व्यावसायिकाने फिरते रसवंतीगृह सुरू केले आहे. सध्या हंगाम सुरू झाल्याने पोटापाण्यासाठी त्यांची रसवंती एक्स्प्रेस खेडोपाडी धावतांना नजरेस पडत आहे.
गदेवाडी (ता.शेवगाव) येथील नानासाहेब जगन्नाथ नाचण (वय ४५) हे अल्पभूधारक शेतकरी असून दरवर्षी ऊसतोडणीसाठी जात असतात. मात्र यंदा त्यांनी स्वतःचा रसवंतीचा व्यवसाय सुरू केला आहे. यासाठी त्यांनी १० हजार रुपये खर्चून चारा वाहण्यासाठी तयार केलेल्या टायरगाडीचा सदुपयोग केला आहे. या गाडीला त्यांनी लाकडी फळ्या जोडून त्यावर लोखंडी चरखा बसवला आहे. मोटारीसह लोखंडी चरख्यासाठी त्यांना जवळपास २५ हजार रुपये खर्च आला. ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी घुंगराचा आवाज तसेच रसवंतीगाडी अधिक आकर्षक वाटावी यासाठी त्यांनी गाडीवरच रंगीबेरंगी चारपायी मांडव देखील थाटला आहे. ही टायरगाडी ते आपल्याकडे असलेल्या जुन्या दुचाकी मोटारसायकलला पाठीमागे जोडून खेडोपाडी फिरत असतात. परिसरातील आठवडे बाजार, शाळा परिसर तसेच बोधेगाव, चापडगाव, बालमटाकळी, हातगाव, मुंगी, दहिगाव शे, खानापूर, पैठण, घारी, चांगतपुरी आदींसह इतर गावात जाऊन व्यवसाय करतात. दिवसभरात ३ ते ४ खेडे, वाडी-वस्ती फिरून साधारणतः ७०० ते ८०० रूपयांची कमाई होत असल्याचे नानासाहेब नाचण सांगतात.
खेडोपाडी लहान मुले, महिला, वयोवृद्ध व्यक्ती आदींना रसवंतीगृहात जाऊन रस पिणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत थेट घरापर्यंत पोहोच होऊ शकणाऱ्या रसवंतीगाडी वरील रस पिणे रसप्रेमींना सहज शक्य होत असल्याने ग्राहकांचा या रसवंती एक्स्प्रेसला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
...
मला दीड-दोन एकर शेती असून दरवर्षी ऊस तोडणीला जात असतो. परंतु यंदा रसवंती गाडी तयार करून हा व्यवसाय सुरू केला आहे. आठवडे बाजार तसेच दररोज खेड्यापाड्यात फिरून चांगला धंदा मिळत आहे.
-नानासाहेब नाचण, रसवंती व्यावसायिक, गदेवाडी.
...
फोटो-१२ बोधेगाव रसवंती
...
ओळी-गदेवाडी (ता.शेवगाव) येथील नानासाहेब जगन्नाथ नाचण यांनी तयार केलेली फिरते रसवंती गृहासाठीची आकर्षक टायरगाडी.