कोरोनात कोलमडलेले रसवंती गाडे यंदा जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:22 AM2021-02-09T04:22:48+5:302021-02-09T04:22:48+5:30

बोधेगाव : मागील वर्षी ऐन हंगाम सुरू होण्याच्या मुहूर्तावरच कोरोनाचे संकट ओढावल्याने शहरांसह ग्रामीण भागातील सर्वच उद्योगधंदे बंद पडले ...

Raswanti's car crashed in Corona | कोरोनात कोलमडलेले रसवंती गाडे यंदा जोमात

कोरोनात कोलमडलेले रसवंती गाडे यंदा जोमात

बोधेगाव : मागील वर्षी ऐन हंगाम सुरू होण्याच्या मुहूर्तावरच कोरोनाचे संकट ओढावल्याने शहरांसह ग्रामीण भागातील सर्वच उद्योगधंदे बंद पडले होते. त्यात खेड्यापाड्यातील रसवंती गाडेही न फिरताच कोलमडून पडल्याने व्यावसायिक अडचणीत सापडले होते. मात्र यंदा उन्हाच्या चटक्यांसोबतच वेळेवर रसवंतीचे गाडे पुन्हा जोमाने फिरू लागल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला.

शेवगाव तालुक्यातील बोधेगावसह परिसरातील चापडगाव, बालमटाकळी, हातगाव, कांबी, मुंगी, लाडजळगाव, सुकळी आदी गावांत अनेक बेरोजगार तरुण उन्हाळ्यात रसवंतीचा व्यवसाय करतात. साधारणपणे उन्हाचा चटका वाढल्यानंतर फेब्रुवारी-मार्च महिन्यात रसवंतीगृहे चालू केली जातात. परंतु, मागील हंगामात कोरोनामुळे लाॅकडाऊन घोषित केल्यानंतर रसवंती चालवणाऱ्या व्यावसायिकांवर संकट ओढावले होते. मात्र सध्या परिस्थिती पूर्वपदावर आल्याने आठवडे बाजारासह सर्वच उद्योग-व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यात उन्हाच्या झळा जाणवू लागल्याने शीतपेय, रसवंती व्यवसायही जोर धरू लागले आहेत.

बोधेगाव येथील गणेश बाळासाहेब घोरतळे (वय २०) या तरुणाने शेवगाव-गेवराई मार्गालगत मारोती वस्ती येथे ३० ते ४० हजार रुपये खर्चून लाकडी चरखा बसवला आहे. रविवारी (दि. ७) या लाकडी चरख्याला एक बैल जुंपून त्याने आपले रसवंतीगृह सुरू केले आहे. १२ वी (विज्ञान) चे शिक्षण पूर्ण करून तो वडिलांसह मागील चार वर्षांपासून रसवंतीचा व्यवसाय करत आहे.

ग्राहक लाकडी चरख्यांवरील रसाला अधिक पसंती देत असून रसवंतीसाठी मार्च ते जून या चार महिन्यांच्या हंगामात जवळपास २ ते ३ टन ऊस लागतो. यातून साधारणतः ६० ते ७० हजार रुपयांचा व्यवसाय होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या वर्षी रसवंतीगृहे सुरू झाल्याने खास रसवंतीसाठी ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही काहीसा दिलासा मिळाला असल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळते आहे.

----

मागील हंगामात केवळ १० ते १२ दिवसच रसवंतीचा गाडा फिरू शकला होता. यामुळे मोठा आर्थिक फटका बसला होता. मात्र चालू वर्षी वेळेवर धंद्याला सुरुवात झाल्याने समाधान वाटते आहे.

- गणेश बाळासाहेब घोरतळे,

रसवंती व्यावसायिक, बोधेगाव

फोटो ओळी ०८ रसवंती गाडे

बोधेगाव (ता. शेवगाव) येथील मारोती वस्ती येथे सुरू झालेला गणेश बाळासाहेब घोरतळे यांचा रसवंतीचा लाकडी चरखा.

Web Title: Raswanti's car crashed in Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.