रतडगावच्या आजीबाईंची कोरोनावर यशस्वी मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:15 AM2021-04-29T04:15:25+5:302021-04-29T04:15:25+5:30
निंबळक : नगर तालुक्यातील रतडगाव येथील ७० वर्षीय कोरोना बाधित एका आजीबाईंची ऑक्सिजन पातळी खालावत जाऊन थेट ६५ ...
निंबळक : नगर तालुक्यातील रतडगाव येथील ७० वर्षीय कोरोना बाधित एका आजीबाईंची ऑक्सिजन पातळी खालावत जाऊन थेट ६५ पर्यंत आली. त्यामुळे कोविड सेंटर, जिल्हा रुग्णालयाने उपचारासाठी भरती करून घेण्यास नकार दिला. आता सगळे संपले असे वाटत होते. मात्र, त्यांनी धैर्याने कोरोनाला तोंड दिले. घरात राहून औषधोपचार केले आणि काही दिवसांतच आजीबाईंनी कोरोनावर यशस्वी मात केली.
गर्भगिरीच्या कुशीत वसलेल्या रतडगाव ( ता. नगर ) येथील केशरबाई बन्सी चेमटे असे त्या आजीबाईंचे नाव आहे. केशरबाई यांना ताप, अंगदुखी, खोकला अशी लक्षणे दिसू लागली. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची कोरोना चाचणी केली. त्यात त्या बाधित आढळून आल्या. त्यांना लगेच बुऱ्हाणनगर येथील कोविड सेंटर येथे भरती करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला. तेथे त्यांची ऑक्सिजन पातळीची तपासणी केली असता ती थेट ८० च्या आत दिसून आली.
बुऱ्हाणनगर येथील कोविड सेंटरमध्ये त्यांना भरती करून घेतले नाही. मग त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यासाठी नेण्यात आले. मात्र, तेथे ऑक्सिजन बेड शिल्लक नव्हते. इतर ठिकाणीही अशीच परिस्थिती होती. यामुळे नाईलाजास्तव त्यांना पुन्हा घरी नेण्यात आले. डॉक्टरांची औषधे व काही घरगुती उपाय सुरू करण्यात आले. काढा, अंडी तसेच इतर पौष्टिक आहार त्यांना सुरू करण्यात आला. काही दिवस घरीच औषधोपचार केल्यानंतर त्यांचा थकवा, अंगदुखी कमी झाली. मोठ्या धैर्याने त्यांनी कोरोनाला हरवत आपला दिनक्रम सुरू केला आहे.
---
कोरोना बरा होणारा आजार..
कोरोना हा बरा होणारा आजार असून वेळेत तपासणी, औषधोपचार आणि तुमची सकारात्मक इच्छाशक्ती हवी, असे केशरबाई चेमटे आवर्जून सांगतात.