रेशनकार्डला आधार लिंक नसल्यास रेशन बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:15 AM2021-01-10T04:15:49+5:302021-01-10T04:15:49+5:30
अहमदनगर : केंद्र शासनाच्या आदेशानुसार रेशनकार्डावर धान्याचा लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील सर्व रेशनकार्डधारकांना आपला आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक करण्यात ...
अहमदनगर : केंद्र शासनाच्या आदेशानुसार रेशनकार्डावर धान्याचा लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील सर्व रेशनकार्डधारकांना आपला आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आधारसोबत मोबाईल क्रमांकही लिंकिंग केला जाणार आहे. रेशनकार्डला आधार लिंक नसल्यास १ फेब्रुवारीपासून रेशन बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक शंभर टक्के लिंक करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार आधार व मोबाईल लिंकिंग करण्याचे सर्व अधिकार स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आले आहेत. ई-केवायसी पडताळणी व मोबाईल सिडिंग सुविधा प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात आहे. रेशनकार्डमध्ये नोंद असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्याला आधारकार्ड घेवून संबंधित स्वस्त धान्य दुकानात जावून ई-केवायसी पडताळणी करून घेणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी वैयक्तिकपणे जावून आधारकार्ड व अंगठ्याचा ठसा पॉस मशीनवर द्यायचा आहे. तसेच कुटुंबातील किमान एका सदस्याचा मोबाईल क्रमांक लिंकिंगसाठी द्यायचा आहे.
जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे ८८ हजार ५१० आणि प्राधान्य कुटुंब योजनेचे ५ लाख ९६ हजार ४८३ असे एकूण ६ लाख ८४ हजार कार्डधारक आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी मोहीम राबवून लाभार्थ्यांचे आधार, मोबाईल लिकिंग सुधारणे आवश्यक आहे. यासाठी दुकानांमधील ई-पॉस उपकरणांमधील ईकेवायसी व मोबाईल लिंकिंग सुविधेचा अधिकतम वापर करून आधार व मोबाईल क्रमांक सिडिंगचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. यासाठी ३१ जानेवारी २०२१ पूर्वी प्रत्येक रेशन कार्डमधील लाभार्थ्यांचे शंभर टक्के आधार लिंकिंग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक लिंक करण्यात येणार आहे. त्यानंतर लिकिंग झाले नसल्याने धान्य मिळणार नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी माळी यांनी सांगितले.
---
स्वस्त धान्य दुकानावर होणार लिंकिंग
दरमहा धान्याचे वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाद्वारे रास्त भाव दुकानदार यांच्यामार्फत रेशनकार्ड हे आधार व मोबाईल लिंकिंग करण्यात येणार आहे. आधार लिंकिंग नसलेल्या लाभार्थ्यांना रास्तभाव दुकाननिहाय यादी तयार करण्यात आली आहे. ३१ जानेवारीपूर्वी लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल क्रमांक लिंकिग करण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले आहेत. यासाठी लाभार्थ्यांकडे आता फक्त २० दिवस शिल्लक राहिले आहेत.