जनतेचे रावसाहेब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 03:45 PM2019-08-18T15:45:22+5:302019-08-18T17:30:42+5:30
अवघे दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले ग़रा़ उर्फ रावसाहेब म्हस्के यांनी आपल्या कार्य आणि कर्तृत्वातून जिल्ह्यात शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शाश्वत कामांचा डोंगर उभा केला आहे़ निबोंडीच्या सेवा सोसायटीचे अध्यक्ष ते आमदार तसेच अनेक संस्थांची जबाबदारी समर्थपणे संभाळणारे आणि अहमदनगर जिल्हा मराठा समाज संस्थेच्या विस्तारात मोठे योगदान असलेले नेतृत्व अशी सर्वव्यापी ओळख़ आमदार असताना विधानसभेत शेतकरी, सुशिक्षित बेरोजगारी ते पंचायत राज व्यवस्थेच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन मांडून ग्रामविकासाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी रावसाहेबांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्य केले़
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव परिसरातील निंबोडी येथे २१ जुलै, १९१४ रोजी गणपतराव राजाराम उर्फ रावसाहेब म्हस्के यांचा जन्म झाला़ गणपतरावांनी शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या अलौकिक कार्यामुळे त्यांना जनतेनेच ‘रावसाहेब’ही पदवी बहाल केली़
बालपणीच रावसाहेब मातृसुखाला पारखे झाले़ मातृछत्र हरपल्यानंतर त्यांना पित्याचाही जिव्हाळा मिळू शकला नाही़ त्यामुळे रावसाहेबांच्या वाट्याला बालपणापासूनच संघर्ष आला़ आईचे निधन झाल्यानंतर रावसाहेब आजोळी कौडगाव (ता़ पाथर्डी) येथे राहायला गेले. त्यांचे मामेभाऊ जयराम आठरे यांनी त्यांना आधार देऊन सांभाळ केला. पुढे अहमदनगर येथे हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज मराठा बोर्र्डिंग येथे राहून रावसाहेब यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्या काळातील आजूबाजूच्या राजकीय, सामाजिक जीवनाचे पडसाद व परिणाम रावसाहेबांवर उमटत होते. ते आंदोलन व इतर सामाजिक चळवळीत सक्रिय सहभागी होऊ लागले़ या काळात साम्यवादाचा प्रभाव रावसाहेबांवर पडला. रावसाहेबांनी मॅट्रीकनंतर काही काळ शेवगाव तहसील कार्यालयात नोकरी केली. नंतर नगर येथे जिल्हा लोकल बोर्डात लिपिक, स्टोअरकिपर व असिस्टंट चिफ आॅफिसर म्हणून नोकरी केली. १९६१ साली त्यांनी जि.लो. बोर्डातून निवृत्ती घेतली़
दरम्यान नगर जिल्हा लोकल बोर्डात नोकरीत असताना रावसाहेबांचा माधवराव लवांडे, जि.लो. बोर्डाचे अध्यक्ष रा.ब. नामदेवराव नवले, सरदार शिवराव थोरात, कॉ.बापूसाहेब भापकर आदी कर्तृत्ववान नेत्यांशी जवळून संबंंध आला़ गोरगरिबांची कामे मार्गी लावण्यात रावसाहेब अग्रभागी असत. त्यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना जि.लो. बोर्डात नोकरीची संधी दिली़ नोकरीतून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांचा विविध सार्वजनिक व सामाजिक संस्थांशी संबंध आला. कार्याचा विस्तार वाढू लागला. जनमाणसात ते आदरणीय होऊ लागले. समाजकार्य व अखंडकार्य असे शब्द त्यांनी हृदयात कोरले. तनमनधनाने प्रामाणिकपणे संस्थांची उभारणी करू लागले. संघटनात्मक कार्याला वेग आला. नोकरीतून हे सामाजिक भान येणे व समाजहितास उदात्त स्वरुप देणे याचे हे उत्तम उदाहरण आहे. जि.प. सर्व्हन्टस् को-आॅप. सोसायटी अहमदनगर, जयहिंद अहमदनगर जि.प. पगारदार नोकरांची पतपेढी, जि.लो. बोर्ड कामगार युनियन ही मैल कामगारांची पहिली संस्था रावसाहेबांनी स्थापन केली़
रावसाहेब जि.लो. बोर्डात असताना सन १९४८-४९, ५३-५४, ५४-५५ व ५९-६० या चार आर्थिक वर्षात जि.लो. बोर्ड, सर्व्हंटस को-आॅप. सोसायटीचे अध्यक्ष होते. पुढे जि.लो. बोर्डातील चीफ आॅफिसर, इंजिनियर व अकौंटंट या संस्थेत (एक्स. आॅफिसियो) पदसिद्ध कार्यकारी मंडळाचे सभासद असावयाचे. त्यांचेपैकी एकाची संस्थेचा अध्यक्ष म्हणून निवड व्हायची. ती पद्धत रावसाहेबांनी बदलली. कार्यकारी मंडळाचे इतर सभासद संस्थेचे अध्यक्ष होऊ लागले. त्यांचा हा दृष्टिकोन व्यापक व दूरदृष्टीचा होता.
जि.लो. बोर्डाचे मैल कामगार हे सुरुवातीस रोजगार पद्धतीने होते. त्यांना नोकरीची हमी नव्हती. अधिकाºयांच्या इच्छेनुसार कधीही कमी केले जात होते. नंतर कोणालाही नोकरीवर घेतले जात होते. त्यामुळे गरीब मैल कामगारांचे नुकसान होत होते़ रावसाहेबांच्या प्रयत्नामुळे सन १९५६ साली २४१ मैल कामगारांना जि.लो. बोर्डात कायम करण्यात आले. त्यांना नोकरीची हमी देण्यात आली. तसेच १३-१२-१९५६ ला मैल कामगारांची स्वतंत्र संस्था निर्माण केली. सन ६०-६१ पर्यंत रावसाहेब या संस्थेचे अध्यक्ष होते.
रावसाहेब हे अहमदनगर जि.प. सर्व्हंटस् को-आॅप. सोसायटीच्यावतीने सन १९४६-४७ ते १९४९-५० या काळात अर्बन बँकेचे संचालक होते. त्यानंतर व्यक्तिश: सभासदांतर्फे सन १९५०-५१ व ५२-५३ या काळातही संचालक होते. या काळात बँक सभासदांची अनेक कामे केली. बँक सभासदांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बँकेच्या संचालक मंडळावर निवडून जाणारे पहिले बहुजन समाजाचे प्रतिनिधी होते़ रावसाहेब १९६१ साली नोकरीतून सेवानिवृत्त झाले. नंतर त्यांनी त्यांचे आयुष्य समाजसेवेसाठी मुक्तपणे देण्याचे ठरविले व त्यांना तसा वेळ देता आला. सन १९६२ पासून ते अखेरपर्यंत आपल्या निंबोडी गावच्या सेवा संस्थेचे अध्यक्ष होते.
पंचायत समितीचे सभापती
जि.लो. बोर्डाच्या बरखास्तीनंतर जि.प. ची स्थापना झाली. पाथर्डी तालुक्यातील करंजी गटातून ते अपक्ष म्हणून निवडून आले. सन १९६२ ते १९६४ पर्यंत ते पाथर्डी तालुका पंचायत समितीचे सभापती होते. त्यांनी तेथे उत्कृष्ट कार्य केले. महाराष्टÑ राज्यात पुणे विभागात पाथर्डी पंचायत समिती प्रथम क्रमांकाने गौरविली गेली़
सन १९६२-६७ पर्यंत जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी ग्रामीण भागातील विकासकामे मार्गी लावली़ अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून १९७०-७७ काळातील त्यांचे काम आदर्श होते.सन १९७० साली श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चिफ प्रमोटर म्हणून त्यांनी प्रमुख भूमिका बजावली. पाथर्डी तालुका जिरायत व दुर्लक्षित भाग आहे. त्या भागात औद्योगिक विकासाला एक प्रकारे रावसाहेबांनी परिसस्पर्श घडविला. सन १९७२ पासून जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने कारखान्याचे संचालक म्हणून ते कार्यरत होते़
सन १९७२ साली रावसाहेब यांनी पाथर्डी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी केली़ या निवडणुकीत ते बहुमताने विजयी झाले़ याच काळात भयंकर दुष्काळ पडला़ या दुष्काळाचा सामना करण्यासाठी रावसाहेबांनी नियोजनबद्ध काम केले़ दुष्काळात जनतेला आधार देण्यासाठी त्यांनी अनेक कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले़ त्या सर्व कामांना मंजुरी मिळवून घेतली़ रावसाहेबांनी पाथर्डीसह नगर जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता थेट दिल्लीपर्यंत पोहोचविली़ पर्यायाने भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी पाथर्डी तालुक्यात भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली़ एक अभ्यासू आमदार म्हणून रावसाहेब यांची विधानसभेतील कारकिर्द सर्वांसाठीच संस्मरणीय ठरली़ रावसाहेबांचे शैक्षणिक कार्य हा त्यांच्या जीवनचरित्राचा मुख्य गाभा आहे. ते कार्य अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून उभे राहिले. रावसाहेबांनी या संस्थेचा शैक्षणिक प्रपंच, लेकीच्या प्रपंचाची जशी काळजी वाहावी त्या पद्धतीने केला. रावसाहेबांनी संस्थेच्या कामानिमित्त केलेल्या प्रवासाचा कधीच प्रवास खर्च लावला नाही़ रावसाहेबांना आर्थिक अडचणींमुळे कॉलेजचे शिक्षण घेता आले नाही. मात्र त्यांनी इंग्रजीचा चांगला अभ्यास केला व ते उत्तम इंग्रजी लिहित व इंग्रजीत पत्रव्यवहार उत्तम करीत असत.
रावसाहेब १९५३ पासून तर शेवटपर्यंत संस्थेच्या सचिव पदावर कार्यरत होते. १९५९ पासून संस्थेने नगर जिल्ह्यात शैक्षणिक विकासाला प्रारंभ केला. ग्रामीण विभागात माध्यमिक शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, आश्रमशाळा आदी संस्था सुरू करण्यात आल्या. ते सर्व कामकाज रावसाहेब स्वत: पाहत. संस्थेचे कार्य आणि त्याचा थेट ग्रामीण तळागाळातील दुर्बल घटकांना शिक्षणाचा लाभ घडावा ही त्यांची भूमिका होती.संस्थाचालक व जनता, कार्यकर्ते यांच्यात जिव्हाळा निर्माण केला. रावसाहेबांच्या जीवनाचा मागोवा घेतला असता काही वैशिष्ट्ये स्पष्टपणे जाणवतात- प्रेम, सेवाभाव, त्यागी जीवन, कर्तव्यनिष्ठा, ध्येयवाद, जिद्द, चिकाटी, अखंड कार्यमग्न राहाणे़ २९ जुलै १९७७ रोजी रावसाहेब यांचे मुंबई येथील रुग्णालयात निधन झाले़ ३० जुलै रोजी त्यांचे पार्थिव मुंबई येथून नगर व तेथून निंबोडी येथे आणण्यात आले़ तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
शब्दाकंन - अरुण वाघमोडे, उपसंपादक, लोकमत, (या लेखातील संदर्भ, आमदार गणपतराव राजाराम ऊर्फ रावसाहेब म्हस्के जन्मशताब्दी स्मारक ग्रंथातील आहे.)