विद्यार्थ्यांची मराठीकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:30 AM2019-06-21T11:30:02+5:302019-06-21T11:33:35+5:30
एकीकडे मराठी अस्मितेच्या जतन आणि संवर्धनाचा मुद्दा राज्यकर्त्यांकडून पुढे आणला जात असताना दुसरीकडे मात्र गुणांच्या लालसेपोटी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मराठीऐवजी हिंदी, संस्कृत अशा भाषांना प्राधान्य दिले जात आहे.
भरत मोहोळकर
अहमदनगर : एकीकडे मराठी अस्मितेच्या जतन आणि संवर्धनाचा मुद्दा राज्यकर्त्यांकडून पुढे आणला जात असताना दुसरीकडे मात्र गुणांच्या लालसेपोटी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मराठीऐवजी हिंदी, संस्कृत अशा भाषांना प्राधान्य दिले जात आहे.
सध्या अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यावेळी विषय निवड करताना मराठी ही आपली मातृभाषा असतानाही बहुतांश विद्यार्थ्यांनी हिंदी व संस्कृत या अधिक गुण मिळवून देणाऱ्या विषयांना प्राधान्य दिल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे. काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता, या विद्यार्थ्यांनी सांगितले की, मराठी ही भाषा बोलायला सोपी आहे, परंतु लिहायला व्याकरणामुळे अवघड आहे. त्याचा गुणांकणावर परिणाम होतो. याउलट शंभरपैकी शंभर गुण मिळवून देणारे हिंदी व संस्कृत हे भाषा विषय अधिक सोईस्कर वाटतात. मराठी भाषा विषयाच्या परीक्षेत प्रश्नांची उत्तरेही शुद्धलेखनदृष्ट्या अचूक असावे लागतात. त्यामुळे शुद्धलेखनातील चुकांचा गुणांवर परिणाम होतो. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळेत शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांना मराठी भाषा अवघड जाते. तसेच मराठी भाषा ही महाराष्ट्रापुरतीच मर्यादित असल्याने आता बदल स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे काही विद्यार्थिनी म्हणाले़ दुसरीकडे हिंदी व इंग्रजी हे विषय अवघड जात असल्याने नाईलाजास्तव मराठी घेत असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. काही विद्यार्थ्यांनी मात्र मराठीच्या बाजूने कल दिला. आम्हाला मराठीचा अभिमान आहे. मराठी बोलायला व समजण्यास सोपी जाते.त्यामुळे अकरावीसाठी मराठी विषय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठीत लिहिताना अनेक चूका होतात. त्यामुळे गुणांवर परिणाम होतो. त्यामुळे मराठीऐवजी हिंदी हा विषय निवडला आहे. -अजिंक्य थोरात, विद्यार्थी
मराठी भाषा बोलायला सोपी आहे, परंतु लिहिताना शुद्धलेखनाच्या अनेक चूका घडतात. यामुळे त्याचा गुणांवर परिणाम होतो. म्हणून आपण हिंदी हा जास्त गुण मिळवून देणारा विषय निवडला आहे. -निरज सागावकर, विद्यार्थी
मराठी ही आपली मातृभाषा आहे़ त्यामुळे प्रत्येकाला तिचा अभिमान असला पाहिजे. म्हणून मी मराठी हा विषय निवडला आहे. -ओम जवळकर, विद्यार्थी
सर्व प्रगत राष्ट्रांच्या शिक्षण प्रणालीचा विचार केला असता तेथील मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते. ज्ञान समजून घेण्यासाठी व आत्मसात करण्यासाठी मातृभाषा हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण दिले जाणारे देश पटकन प्रगती करताना दिसतात. त्यामुळे आपण मराठी भाषेचा स्वीकार करायला हवा. - प्रा. शरद कोरडे, शिक्षक