मोहटा देवस्थानच्या विश्वस्तांवर ठपका; फेरनिवडीला घेतला आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:53 PM2019-11-16T12:53:58+5:302019-11-16T12:55:18+5:30
मोहटा देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या कारभाराची धर्मादाय आयुक्तांमार्फत चौकशी सुरु आहे. निरीक्षकांनी केलेल्या चौकशीत देवस्थानच्या काही विश्वस्तांच्या कामकाजाबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.
अहमदनगर : मोहटा देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या कारभाराची धर्मादाय आयुक्तांमार्फत चौकशी सुरु आहे. निरीक्षकांनी केलेल्या चौकशीत देवस्थानच्या काही विश्वस्तांच्या कामकाजाबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे फेरनिवडीत अशा विश्वस्तांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी देवस्थानचे माजी विश्वस्त नामदेव गरड यांनी प्रधान जिल्हा न्यायाधीशांकडे केली आहे.
मोहटा देवी विश्वस्त मंडळाचा कार्यभार २४ नोव्हेंबर रोजी संपत आहे. देवस्थानच्या पंधरा विश्वस्तांपैकी दहा विश्वस्तांची निवड ही जिल्हा न्यायालयामार्फत केली जाते. ती प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी अनेकांनी अर्जही दाखल केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गरड यांनी जिल्हा न्यायालयाला लेखी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, २०१३ ते २०१६ या काळात देवस्थानमध्ये झालेल्या गैरप्रकारांबाबत आपण धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केलेली आहे. या तक्रारीवर चौकशी सुरु आहे. धर्मादाय उपआयुक्त कार्यालयातील निरीक्षकांनी केलेल्या चौकशीत काही बाबींत अनियमितता असल्याचेही समोर आले आहे. तसा अहवाल निरीक्षकांनी दिला आहे. काही विश्वस्तांनी या चौकशीत अजिबातही सहकार्य केले नाही. ते चौकशीला हजर राहिले नाही, असा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. काही विद्यमान विश्वस्तांनी धमकीची भाषा चौकशी समितीला वापरलेली आहे. ती नावेही अहवालात नमूद आहेत. या अहवालावर उपआयुक्तांनी पुन्हा ४१ ब खाली चौकशी सुरु केली आहे.
विद्यमान विश्वस्तांपैकी काहींनी फेरनियुक्तीसाठी अर्ज सादर केले असण्याची शक्यता आहे. मात्र धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा अहवाल पाहिला तर विद्यमान विश्वस्तांची फेरनिवड का करावी, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे निवड प्रक्रियेत या बाबीचा विचार व्हावा, असे गरड यांचे म्हणणे आहे. देवस्थानमधील अनियमिततेबाबत फौजदारी कारवाई व्हावी याबाबत गरड यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल केलेली आहे. ती याचिकाही अंतिम टप्प्यात असल्याकडे प्रधान जिल्हा न्यायाधीशांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
काही विश्वस्तांना वारंवार संधी
मोहटा देवस्थानवर काही विश्वस्तांना पुन्हा पुन्हा संधी मिळालेली दिसते. या विश्वस्तांची निवड ही न्यायालयामार्फत होते. एकाच व्यक्तीची वारंवार निवड झाल्यास अशा व्यक्तींचे जिल्हा न्यायालयातील न्यायिक अधिकाºयांशी संबंध प्रस्थापित होऊ शकतात, असाही मुद्दा या निवड प्रक्रियेत उपस्थित होऊ शकतो.
पदसिद्ध विश्वस्त चौकशीला गैरहजर
मोहटा देवस्थानवर जिल्हा न्यायाधीश, पाथर्डी येथील दिवाणी न्यायाधीश, तहसीलदार व गटविकास अधिकारी तसेच उपवनसंरक्षक हे पदसिद्ध विश्वस्त आहेत. मात्र, ते कधीही चौकशीला उपस्थित राहिले नाहीत, असेही निरीक्षकांनी अहवालात नमूद केले आहे. उर्वरित विश्वस्तांपैकी केवळ हर्षवर्धन पालवे हे उपस्थित रहायचे. त्यांनी तत्कालीन अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे बाजूने जबाब दिलेले आहेत. कर्मचारी भरतीत तत्कालीन अध्यक्षांनी अधिकचे गुण दिलेले असतानाही पालवे यांनी त्यांचे चौकशीत समर्थन केले, असे निरीक्षण चौकशी अहवालात आहे. कोणते विश्वस्त बैठकांना उपस्थित असतात व कोण गैरहजर असतात याचा प्रोसिडिंग बुकवरुन बोध होत नाही, असाही ठपका या अहवालात आहे. अध्यक्षांनी कर्मचारी भरतीत अधिकाराचा दुरुपयोग केला हे गंभीर निरीक्षण निरीक्षकांनी नोंदविलेले आहे.