आंदोलनाचा इशारा आणि रेमडेसिविर इंजेक्शन मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:21 AM2021-04-25T04:21:15+5:302021-04-25T04:21:15+5:30
श्रीगोंदा : अनेक कोरोनाबाधित रुग्ण रेमडेसिविरअभावी जीवन-मृत्यूशी संघर्ष करीत होते. प्रशासनाकडून मात्र उपलब्ध रेमडेसिविर वितरणाची परवानगी मिळत ...
श्रीगोंदा : अनेक कोरोनाबाधित रुग्ण रेमडेसिविरअभावी जीवन-मृत्यूशी संघर्ष करीत होते. प्रशासनाकडून मात्र उपलब्ध रेमडेसिविर वितरणाची परवानगी मिळत नव्हती. अर्ध्या तासात रेमडेसिविर न दिल्यास ती ‘लुटून’ रुग्णांना देण्याचा इशारा राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण शेलार यांनी दिला. त्यानंतर काही वेळातच रेमडेसिविर इंजेक्शन वितरणाचे आदेश निघाले.
यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, शाम जरे व राजेंद्र काकडे उपस्थित होते.
यासंदर्भात प्रवीण शेलार म्हणाले, ६० रेमडेसिविर इंजक्शन शुक्रवारी रात्रीपासून येथील एका मेडिकलमध्ये उपलब्ध होते. औषध निरीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेले अधिकारी यांच्या परवानगीशिवाय त्याची विक्री करता येत नव्हती. याबाबत प्रशासनाने मेडिकलला विक्रीबाबत सूचना दिल्या नव्हत्या. त्यामुळे औषध विक्रेता हे इंजेक्शन रुग्णांना देत नसल्याची बाब समोर आली. त्यावर शेलार व गायकवाड यांनी तहसीलदार प्रदीप पवार यांच्याशी संपर्क केला.
त्यानंतर नगरच्या औषध निरीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला. त्यांनी मिटिंगमध्ये असल्याचे सांगून याबाबतचे आदेश देऊ, असे म्हणत टोलवाटोलवी केली.
यावर शेलार यांनी प्रशासनास अर्धा तासाची मुदत दिली. या कालावधीत रेमडेसिविर विक्रीचा आदेश न आल्यास हे इंजेक्शन मेडिकलमधून ‘लुटून’ ते रुग्णालयात गरजूंना देण्याचा इशारा त्यांनी दिला.
आमच्यावर हवे ते गुन्हे नोंदवा, असे आव्हान त्यांनी दिले. त्यानंतर अर्ध्या तासाच्या आत प्रशासनाने हालचाल करून इंजेक्शन विक्रीचा आदेश काढला. हे साठ इंजेक्शन शहरातील विविध रुग्णांना देण्यात आले.