दैंनंदिन रुग्णसंख्येचा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:22 AM2021-05-06T04:22:41+5:302021-05-06T04:22:41+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येचा बुधवारी उच्चांक झाला. २४ तासांत तब्बल ४४७५ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. गत आठवड्यात ...
अहमदनगर : जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येचा बुधवारी उच्चांक झाला. २४ तासांत तब्बल ४४७५ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. गत आठवड्यात हीच रुग्णसंख्या चार हजार दोनशेपर्यंत गेली होती. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील दैनंदिन रुग्णसंख्या प्रथमच विक्रमी झाल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने चिंता व्यक्त केली आहे.
सध्या जिल्ह्यात दररोज ३२०० ते ३५०० कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, एक मे रोजी प्रथमच कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या ४ हजार २१९ इतकी झाली होती. हाही एक उच्चांकच ठरला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी रुग्णांची संख्या निम्म्यावर घटल्याने दिलासा मिळाला होता. मात्र, बुधवारी रुग्णांत तब्बल साडेचार हजारांनी वाढ झाली. त्यामुळे ही रुग्णसंख्या मार्च २०२० पासून ते आतापर्यंतचा दैनंदिन रुग्णसंख्येचा उच्चांक ठरला आहे. जिल्ह्यात बुधवारी ३१०३ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. रुग्णसंख्या वाढल्याने सध्या सक्रिय रुग्णांची संख्याही २५ हजारांच्या पुढे गेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या आता १ लाख ९३ हजार ६४२ इतकी झाली आहे.
बुधवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०५३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २३८५ आणि अँटिजन चाचणीत १०३७ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर शहर (७६६), नगर तालुका (४६६), संगमनेर (३८६), श्रीगोंदा (३००), पारनेर (२८६), श्रीरामपूर (२८३), राहाता (२८१), कर्जत (२४४), कोपरगाव (२३८), राहुरी (२१९), अकोले (२०४), नेवासा (१५६), शेवगाव (१४४), पाथर्डी (१४४), जामखेड (१३०), इतर जिल्हा (१०६), भिंगार (९२), इतर राज्य (११), मिलिटरी हॉस्पिटल (९) येथील रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, २४ तासांत ९ जणांच्या मृत्यूची आरोग्य यंत्रणेच्या पोर्टलवर नोंद झाली आहे.
-------------
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या : १,६६,३५५
उपचार सुरू असलेले रुग्ण : २५११४
मृत्यू : २१७३
एकूण रुग्णसंख्या : १,९३,६४२