नगर तालुक्यात गव्हाचे विक्रमी उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:20 AM2021-04-07T04:20:40+5:302021-04-07T04:20:40+5:30
केडगाव : सततच्या पावसामुळे नगर तालुक्यात ज्वारीच्या पेरण्या वेळेत होऊ शकल्या नाहीत. त्याचा परिणाम होऊन गव्हाच्या लागवडीत वाढ झाली. ...
केडगाव : सततच्या पावसामुळे नगर तालुक्यात ज्वारीच्या पेरण्या वेळेत होऊ शकल्या नाहीत. त्याचा परिणाम होऊन गव्हाच्या लागवडीत वाढ झाली. प्रतिकूल हवामान असूनही तालुक्यात विक्रमी २६३ मेट्रिक टन गव्हाचे उत्पादन घेण्यात आले.
नगर तालुक्याला ज्वारीचे आगार मानले जाते.
यंदा तालुक्यात सरासरीच्या १८५ टक्के इतका पाऊस झाला. ज्वारीच्या पेरण्याचा कालावधी संपत चालला तरी पाऊस सतत कोसळत असल्याने तालुक्यात ज्वारीच्या पेरण्या वेळेत होऊ शकल्या नाहीत. परिणामी तालुक्यात ज्वारीच्या लागवडीत मोठी घट झाली. ज्वारीचे क्षेत्र यंदा घटले असले तरी मुबलक पाण्यामुळे शेतकऱ्यांनी आपला मोर्चा गहू व हरभरा लागवडीकडे वळवला. यामुळे तालुक्यात ११ हजार ९५६ हेक्टर क्षेत्रावर गव्हाच्या पेरण्या झाल्या. ढगाळी वातावरण, थंडीचा अभाव यामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊनही तालुक्यात प्रथमच २६३ मेट्रिक टन इतके उत्पादन घेण्यात आले.
..........
का वाढले उत्पादन
तालुक्यात यंदा प्रथमच सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यात तालुक्यातील बहुतेक गावांत पाणलोट क्षेत्र अंतर्गत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. नदी खोलीकरण, माती बंधारे, सिमेंट बंधारे, तलावांचे खोलीकरण तसेच गळती बंद करण्यात आल्याने पाण्याच्या भूजल पातळीत वाढ झालेली आहे. पिंपळगाव माळवी, धोंडवाडी तलाव सुमारे ११ वर्षांनंतर भरला होता. भूजल पातळीत वाढ झाल्याने पूर्वी १५ डिसेंबरपर्यंत होणाऱ्या गव्हाच्या पेरणीचा कालावधी वाढला असून चालू वर्षी तर १५ जानेवारीपर्यंत गव्हाच्या पेरण्या करण्यात आल्या आहेत. जेऊर पट्ट्यात गर्भगिरीच्या डोंगरउताराचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने येथे लाल कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कांदा पिकाची काढणी केल्यानंतर पूर्वी ज्वारीची पेरणी करण्यात येत होती परंतु सद्यस्थितीत लाल कांद्याच्या काढणीनंतर गव्हाची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
....
यंदा समाधानकारक पाऊस झाला. पाऊस लांबल्याने ज्वारीच्या पेरण्या वेळेत होऊ शकल्या नाहीत. परिणामी गव्हाच्या लागवडीत वाढ झाली. शेतकऱ्यांना हेक्टरी २२ क्विंटल इतके उत्पादन मिळाले.
- पोपटराव नवले, कृषी अधिकारी, नगर तालुका
......
खराब वातावरणामुळे गव्हाला चांगलाच फटका बसला. चार एकरात ३५ पोते गहू झाला. ४९६ गहू पेरला होता. त्याला १८०० रुपये भाव मिळाला.
- रंगनाथ दरंदले, शेतकरी, हिंगणगाव
.........
चालू वर्षी चार एकर गहू पेरला होता. थंडी नसल्यामुळे पिकाची पाहिजे तशी वाढ झाली नाही. रोग पण पडला होता. चार एकरात ६० पोते झाले. सरासरी २ हजार २०० रुपये भाव मिळाला.
- लक्ष्मण होळकर, शेतकरी, निबंळक
..........
चालू वर्षी मुबलक पाणी व पोषक वातावरणामुळे गव्हाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. काही प्रमाणात गव्हावर तांबेरा, खोडकिडा, तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव जाणवला होता. परंतु शेतकऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या औषधांच्या फवारणीने रोगांवर आळा बसून गव्हाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
- संदीप काळे, साईनाथ कृषी उद्योग, जेऊर