नगर तालुक्यात मतदारांचा विक्रमी प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:24 AM2021-01-16T04:24:26+5:302021-01-16T04:24:26+5:30
केडगाव : नगर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत विक्रमी सरासरी ८० टक्के मतदान झाले. आदर्शगाव हिवरेबाजार येथील मतदारांनी ग्रामपंचायतीसाठी ३५ वर्षानंतर ...
केडगाव : नगर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत विक्रमी सरासरी ८० टक्के मतदान झाले. आदर्शगाव हिवरेबाजार येथील मतदारांनी ग्रामपंचायतीसाठी ३५ वर्षानंतर प्रथमच मतदान केले. शिंगवे नाईकमध्ये मतदान यंत्रात बिघाड झाल्याने दीड तास मतदान प्रक्रिया बंद करावी लागली. संवेदनशील असणाऱ्या बुऱ्हाणनगर, निंबळक, दरेवाडीत कडेकोट पोलीस बंदोबस्तात शांततेत मतदान झाले.
तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. तीन गावांत यापूर्वीच बिनविरोध निवड झाली. डोंगरगणचा अपवाद वगळता शांततेत मतदान झाले.
आदर्शगाव हिवरेबाजारमधील मतदारांनी ३५ वर्षांनंतर प्रथमच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केले. यापूर्वी तेथे १९८५ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक झाली होती. १९८९ नंतर तेथे बिनविरोध निवडणुका झाल्या. येथे दुपारपर्यंत सर्वांधिक ९० टक्के मतदानाची नोंद झाली.
चिचोंडी पाटीलध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आल्याने गर्दी वाढली. किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत गर्दीला पिटाळून लावले त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत केली.
-----
शिंगवेत इव्हीएम मशीन बंद
नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथे सकाळी मतदान सुरळीत सुरू झाले, परंतु काही वेळातच मशीन दोनदा बंद पडले. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया तब्बल दीड तास थांबली होती. नंतर मतदान सुरळीत सुरू झाले.
---
मतदान केंद्रावर मास्क बंधनकारक
मतदान प्रक्रियेतून कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी मतदान केंद्रावर मतदारांना मास्क बंधनकारक करण्यात आले होते, तसेच येणाऱ्या प्रत्येक मतदाराची ऑक्सिमीटरने ऑक्सिजन लेव्हल, तापमान मोजले जात होते. मतदारांना हातावर सॅनिटायझर देऊनच मतदान केंद्रात प्रवेश दिला जात होता.
--------
गावनिहाय मतदानाची टक्केवारी अशी...
वाटेफळ-९५, हिवरेबाजार-९२, ससेवाडी-९२, विळद-९०, उदरमल-८८, नवनागापूर-८६, खारेकर्जुने-९०, पोखर्डी-८६, टाकळी काझी-८६, शिंगवे नाईक-८५, चिंचोडी पाटील-८५, वाळुंज-८५, पारगाव मौला-८४, गुणवडी-८५, डोंगरगण-८५, मांजरसुंबा-७८, रुई-८३, चास -८०, कामरगाव -७५, निबंळक-७८, शहापूर-७३, दरेवाडी-८३, खडकी-९०, इमामपूर-८५, जेऊर-७७, बहिरवाडी -८२, देहरे-८५.
फोटो : १५ नागेश २