एकाच दिवसात तीन कोटींची घरपट्टी वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:24 AM2021-09-26T04:24:00+5:302021-09-26T04:24:00+5:30
अहमदनगर : महानगरपालिका आणि जिल्हा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी झालेल्या महालोक अदालतमध्ये शहरातील मालमत्ताधारकांनी एकाच दिवसात ३ ...
अहमदनगर : महानगरपालिका आणि जिल्हा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी झालेल्या महालोक अदालतमध्ये शहरातील मालमत्ताधारकांनी एकाच दिवसात ३ कोटी २८ लाख रुपये मालमत्ता कराचा भरणा केला आहे. अलीकडच्या काळात एकाच दिवसात जमा झालेली ही सर्वाधिक रक्कम आहे.
महालोक अदालतमध्ये मालमत्ता कराची प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यासाठी २० हजारांपेक्षा जास्त मालमत्ता कर असलेल्या १६ हजार मालमत्ताधारकांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. कोरोना महामारीच्या काळात आर्थिक अडचणीत आलेल्या नागरिकांना सहकार्याच्या भूमिकेतून महानगरपालिकेकडून शास्तीवर ७५ टक्के आणि चालू बिलावर ८ टक्के सूट देण्यात आली होती. फक्त एक दिवस शास्तीमाफी दिली असल्याने १०५० प्रकरणांत एकाच दिवसात ३ कोटी २८ लाख रुपयांचा भरणा महापालिकेच्या तिजोरीत झाला.
या सवलतीबाबत नागरिकांना विविध माध्यमांद्वारे आवाहन करण्यात आले होते. रोख भरणा, चेकद्वारे, ऑनलाइन आणि मोबाइल ॲपद्वारे भरणा करण्यासाठी पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले होते.
१ कोटी ७५ लाख रुपयांची सवलत नागरिकांनी घेतली. याबद्दल महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त शंकर गोरे, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, सभागृह नेते अशोक बडे, महिला व बाल कल्याण समिती सभापती पुष्पा बोरुडे, उपसभापती मीना मुनोत, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त (कर ) यशवंत डांगे यांनी नागरिकांचे कौतुक केले.
या महालोक अदालतमध्ये महापालिका कर संकलन विभागातील कर्मचारी यांनी परिपूर्ण तयारी केली होती. थकबाकीदार मालमत्ताधारकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. सहाय्यक मूल्य निर्धारक सुनील चाफे, सर्व प्रभाग अधिकारी, कर निरीक्षक आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.