नगर जिल्ह्यात वाळूतस्करांकडून तीन कोटीचा दंड वसूल; श्रीगोंदा तालुका आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 07:10 PM2018-01-08T19:10:25+5:302018-01-08T19:11:20+5:30
नगर जिल्ह्यात सन २०१७ मध्ये ३१ डिसेंबरअखेर महसूल प्रशासनाने वाळूतस्करांकडून २ कोटी ९३ लाखाचा दंड वसूल केला. यामध्ये सर्वाधिक दंड श्रीगोंदा तालुक्यात ४८ लाख १८ हजार तर सर्वात कमी नेवासे तालुक्यात १ लाख ६८ हजाराचा दंड वसूल केला आहे.
श्रीगोंदा : नगर जिल्ह्यात सन २०१७ मध्ये ३१ डिसेंबरअखेर वाळूतस्करांच्या विरोधात महसूल प्रशासनाने कारवाई केली. ७०६ वाळूची चोरटी वाहने पकडली. त्यांच्याकडून २ कोटी ९३ लाखाचा दंड वसूल केला. यामध्ये सर्वाधिक दंड श्रीगोंदा तालुक्यात ४८ लाख १८ हजार तर सर्वात कमी नेवासे तालुक्यात १ लाख ६८ हजाराचा दंड वसूल केला आहे.
वाळूची तस्करी करणारी सर्वाधिक १३३ वाहने संगमनेर तालुक्यात पकडण्यात आली. त्यांच्याकडून ४१ लाख ९८ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. नेवाशात अवघी चार वाहने पकडण्यात आली. नगर तालुक्यात ३८ लाख, नेवासा १ लाख ६८ हजार, शेवगाव ८ लाख ९ हजार, श्रीगोंदा ४८ लाख १८ हजार, पारनेर ३५ लाख १६ हजार, संगमनेर ४१ लाख ९८ हजार ,अकोले ४ लाख ५२ हजार, कोपरगाव ३२ लाख ३३ हजार, राहाता ९ लाख ३२ हजार, श्रीरामपूर १० लाख ९० हजार, राहुरी २३ लाख ५३ हजार, कर्जत २० लाख २२ हजार, जामखेड ६ लाख ९८ हजार, असा दंड वाळूतस्करांकडून वसूल करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक पोलीस स्टेशनला १५२ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यामध्ये श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ११० वाळूतस्करांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
शासनाला गोदावरी, मुळा, प्रवरा, भीमा, घोड, सीना आदी नद्यातील वाळू साठ्यांच्या लिलावातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत होता. अलीकडे वाळू लिलावात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे वाळूतस्करीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बेकायदा वाळू उपशातून मिळणारी दंडाची रक्कम वाढली आहे.