बरा झालेल्या दुस-या कोरोना रूग्णाचे नेवाशात टाळ्या वाजवून स्वागत; कुटुंबाला सांभाळल्याबद्दल मानले आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 12:21 PM2020-04-05T12:21:25+5:302020-04-05T12:22:50+5:30
नगर येथील सरकारी रुग्णालयातून बरा झालेला दुसरा रुग्ण शनिवारी नेवासा येथे पोहोचला. यावेळी रुग्ण रहात असलेल्या कॉलनीतील रहिवाश्यांनी टाळ्या वाजवत स्वागत केले. गाडीतून उतरल्यावर रुग्णाने चौदा दिवसात माझ्या कुटुंबाला सांभाळल्याबद्दल आपल्या कॉलनीचे सर्वांचे आभार मानले.
नेवासा : नगर येथील सरकारी रुग्णालयातून बरा झालेला दुसरा रुग्ण शनिवारी नेवासा येथे पोहोचला. यावेळी रुग्ण रहात असलेल्या कॉलनीतील रहिवाश्यांनी टाळ्या वाजवत स्वागत केले. गाडीतून उतरल्यावर रुग्णाने चौदा दिवसात माझ्या कुटुंबाला सांभाळल्याबद्दल आपल्या कॉलनीचे सर्वांचे आभार मानले.
नेवासा येथील सदरचा रुग्ण हा १९ मार्च रोजी पॉझिटिव्ह निघाला होता. तेव्हापासून नगर जिल्ह्यात प्रशासनाने सर्वात जास्त काळजी घेण्यास सुरुवात केली. नेवासा शहरासह जिल्ह्यात लॉकडाउन झाले. १९ तारखेपासून आजपर्यंत नेवासा शहर ही बंद आहे. त्यात आता दहा विदेशी नागरिकांना तपासणीसाठी पाठवले आहेत. तर नेवासा येथे विशेष पोलीस दल दाखल झाले. शनिवारी सदरचा रुग्णाचा १४ आणि १५ व्या दिवशी झालेल्या दोन चाचण्यांमध्ये निगेटिव्ह निघाला. त्यांना नगरच्या बूथ हॉस्पिटलमधून शुक्रवारी नेवासा येथे घरी पाठवण्यात आले.
ठणठणीत बरा झालेला आपला शेजारी येणार म्हणून कॉलनीतील वातावरण उत्साहाचे होते. या कॉलनीतील सर्वं घरांवर प्रशासनाचे विशेष लक्ष होते. कॉलनीतील सर्वांना १४ दिवस होम कॉरंटाईन केले होते. ही विशेष दक्षता आता सर्व नेवासा शहरात पाळण्यात येत आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता रुग्णवाहिका कॉलनीत आल्यावर कॉलनीतील सर्व घरांमधून टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले. कॉलनीतील शेजाºयांनी आपले केलेले स्वागत करून बरा झालेल्या रुग्णालाही गहिवरून आले.
प्रथम पॉझिटिव्ह निघालो. धक्का बसला होता. माझ्या संपर्कात आलेले सर्वांचीच काळजी वाटायला लागली होती. मला त्रास होत नव्हता, पण जेव्हा माझ्या बरोबर कुटुंबीय व संपर्क आलेल्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर जीव भांड्यात पडला. या दरम्यान प्रत्येक चाचणीला टेन्शन असायचेच. पण आपल्याकडची आरोग्य व्यवस्था डॉक्टर यांचे चांगले सहकार्य व लक्ष आहे. दवाखान्यामध्ये अत्यंत चांगल्या सुविधा आहेत. भारतात या रोगातून लोक बरे होत असताना घाबरून जाऊ नये. मात्र काळजी घेणे गरजेचे असल्याचे या रुग्णाने सांगितले.
कोरोना झालेल्या रुग्णाला मानसिक आधाराची जास्त गरज आहे. असे स्पष्ट करताना दवाखान्यांमध्ये देखील मानसोपचार तज्ज्ञाची नेमणूक असावी, असे त्यांनी सांगितले. त्यांना मानसिक आधार दिलेल्या सर्व मेडिकल्स स्टाफ, पोलीस अधिकारी, कर्मचारी, मित्र मंडळ व नातेवाईकांचे त्यांनी आभार मानले.