कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साईदर्शनाचा कालावधी घटवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 06:43 PM2021-02-23T18:43:28+5:302021-02-23T18:44:00+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरातील दर्शनाच्या वेळा कमी करण्याबरोबरच गुरूवारची पालखी बंद करण्यात येणार आहे. रात्रीची संचारबंदी विचारात घेऊन पहाटेची काकड आरती व रात्रीची शेजारती भक्तांविना करण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे.
शिर्डी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरातील दर्शनाच्या वेळा कमी करण्याबरोबरच गुरूवारची पालखी बंद करण्यात येणार आहे. रात्रीची संचारबंदी विचारात घेऊन पहाटेची काकड आरती व रात्रीची शेजारती भक्तांविना करण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी साई संस्थानने विविध निर्णय घेतले आहेत. संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
शिर्डीतील देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्या बघता प्रशासनाच्या दृष्टीने साई मंदिर संवेदनशील आहे. त्या अनुषंगाने भाविक व ग्रामस्थांच्या रात्रीच्या वावरावर निर्बंध आणण्यासाठी रात्री साडेदहा वाजता व पहाटे साडेचार वाजता होणाऱ्या काकड आरती भाविकांविना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पूर्वी साईची आरती व स्नानानंतर पावणेसहा वाजता सुरू होणारे दर्शन सकाळी सहा वाजता सुरू होईल. रात्री साडेदहाच्या आरतीपर्यंत सुरु असणारे दर्शन रात्री नऊ वाजताच बंद करण्यात येईल. यामुळे दर्शनाची वेळ दीड ते पावणे दोन तासांनी कमी होईल.
गेल्या दोन आठवड्यापासून सुरू करण्यात आलेली गुरूवारची पालखी सुद्धा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.