प्राथमिक आरोग्य केंद्रांना शीतयंत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:35 AM2021-05-05T04:35:14+5:302021-05-05T04:35:14+5:30
कर्जत : फेडरल बँक हॉर्मिस मेमोरियल फाउंडेशन व कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जतमधील ३ तर जामखेडमधील ...
कर्जत : फेडरल बँक हॉर्मिस मेमोरियल फाउंडेशन व कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जतमधील ३ तर जामखेडमधील २ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी लस व औषधसाठा ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटर (शीतयंत्रे) प्रदान करण्यात आली.
बारामती ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते या शीतयंत्रांचे लोकार्पण करण्यात आले. कर्जतमधील राशीन, कुळधरण, मिरजगाव तर जामखेडमधील आरणगाव, नान्नज या आरोग्य केंद्रांचा त्यामध्ये सामावेश आहे. याच वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व रोहितदादा पवार मित्रमंडळाच्या वतीने राशीन, कर्जत, मिरजगाव येथे घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराचेही उद्घाटन सुनंदा पवार यांच्या हस्ते झाले. कोरोना महामारीच्या कठीण काळात आमदार रोहित पवार हे कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला गती मिळावी, यासाठीही ते प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून आरोग्य केंद्रांना ही शीतयंत्रे प्रदान करण्यात आली आहेत. फेडरल बँकेच्या सीएसआर फंडातून कोविड १९ लसीकरण कार्यक्रमासाठी विविध आरोग्यसेवा केंद्रांना लस साठवणुकीसाठी ही शीतयंत्रे देण्यात आलेली आहेत.
आमदार रोहित पवार यांच्या आवाहनानुसार कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस व रोहितदादा पवार मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १०९ जणांनी रक्तदान केले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, कानगुडवाडीचे सरपंच शाम कानगुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार, विशाल शेटे, अतुल जाधव, गणेश नलावडे, दादासाहेब तनपुरे, प्रकाश क्षीरसागर, तानाजी पिसे, राम रणदिवे, महेश म्हस्के, वैभव पवार, संकेत चेडे, राजश्री चव्हाण, सुधीर जगताप, सनी सुपेकर, सोमनाथ गजरमल, संदीप जगताप, सोनू बागवान आदी उपस्थित होते.