उखलगाव येथील विलगीकरण कक्षात राहण्यास नकार; तिस-याच दिवशी ‘ते’ दोघे गेले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 12:47 PM2020-05-10T12:47:23+5:302020-05-10T12:48:46+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील पती, पत्नी असलेल्या त्या दोन व्यक्ती दोन दिवस विलगीकरण कक्षात राहून तिस-या दिवशी घरी निघून गेल्या असल्याचे कोरोना ग्रामसुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा सरपंच अनिल ढवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील दोन व्यक्ती ३ मे रोजी देहू (जि.पुणे) येथून आल्या होत्या. त्यांना गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुरू केलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांची राहण्याची चांगली व्यवस्था करण्यात आली होती. तरी त्या दोन व्यक्ती दोन दिवस विलगीकरण कक्षात राहून तिस-या दिवशी घरी निघून गेल्या असल्याचे कोरोना ग्रामसुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा सरपंच अनिल ढवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अशा प्रकारे लोक जर बाहेर गावाहून येऊन सरकारने सुरू केलेल्या निवारागृहात राहण्यासाठी नकार देऊ लागले तर ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर बनणार आहे. विशेष म्हणजे त्या व्यक्तीच्या मुलाशी चर्चा केली असता. त्याने सांगितले की, माझे आई, वडील गावात आल्यानंतर गावात काही लोक आले. मात्र त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले नाही. विलगीकरण कक्षात ठेवताना गाव समितीकडून पक्षपातीपणा केला जात आहे. यामुळे मी आई, वडिलांना घरी घेऊन गेलो असल्याचे त्याने सांगितले.
याबाबत आरोग्य कर्मचाºयांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, १ मे नंतर संबंधित क्वारंटाईन केलेल्या दोनच व्यक्ती गावात आल्या आहेत. इतर लोक मात्र ३० एप्रिलपूर्वीच आल्या असल्याने त्यांना त्यांच्या घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र त्यांना १ ते ५ मे दरम्यान क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले आहेत. तशा प्रकारच्या संबंधित कर्मचा-यांच्या रजिस्टरला नोंदी आहेत. बाहेर गावातून आलेल्या संबंधित व्यक्तींच्या घरी स्वतंत्र व्यवस्था असल्यास त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यासाठी परवानगी आहे. मात्र ग्रामसुरक्षा समितीने पाहणी करून परवानगी देणे गरजेचे आहे. बाहेर गावातून आलेल्या व्यक्ती शेजारच्या घरी क्वारंटाईन असल्या तरी शेजारी राहणा-या लोकांना भीती वाटू लागली आहे.
विलगीकरण कक्षात सर्व सुविधा
कोरेगव्हाण येथील विलगीकरण कक्षात श्रीरामपूर येथून आलेल्या एकाच कुटुंबातील चार व्यक्ती आनंदाने रहात आहेत. त्यांची कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. त्यांचे नातेवाईक त्यांना जेवण पोहोच करीत आहेत. विलगीकरण कक्षात पाणी, वीज व स्वच्छतागृहाची चांगली सोय करण्यात आली असल्याचे सरपंच संतोष नरोडे यांनी सांगितले.