कोपरगावात पालिका कर्मचा-यांना रजेचा संसर्ग: प्रशासकीय कामाचा बट्ट्याबोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 07:30 PM2018-01-10T19:30:56+5:302018-01-10T19:31:49+5:30
नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी सतत आजारपणाच्या रजेवर जात असल्याने प्रशासकीय कामाचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे विकास कामे ठप्प होऊन नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
रियाज सय्यद
कोपरगाव : नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी सतत आजारपणाच्या रजेवर जात असल्याने प्रशासकीय कामाचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे विकास कामे ठप्प होऊन नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. रजेवर जाणा-या अधिकारी व कर्मचा-यांना असा कोणता आजार जडला? हा मात्र संशोधनाचा विषय आहे.
पालिकेत आधीच मनुष्यबळाची वाणवा आहे. शहराचा विस्तार बघता पालिकेला आणखी सक्षम अधिकारी व कर्मचा-यांची आवश्यकता आहे. पाणी पुरवठा विभागाचे सहायक अभियंता प्रवीण लोखंडे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने ३ महिन्यांपासून हे पद रिक्त आहे. पाणी पुरवठ्याचे पर्यवेक्षक विश्वास धुमाळ दीड-दोन महिन्यांपासून आजारपणाच्या रजेवर आहेत. कनिष्ठ अभियंता श्रीकांत बगाड देखील महिनाभरापासून रजेवर गेल्याने रामभरोसे कारभार सुरू आहे. बांधकाम अभियंता विजय पाटील यांच्याकडे पाणी पुरवठ्याचा तात्पुरता पदभार सोपविण्यात आला आहे. आधीच त्यांच्यावर बांधकामसह अतिक्रमण विरोधी पथक प्रमुखाची जबाबदारी आहे. सरकारी कामानिमित्त पाटील यांना बाहेरगावी जावे लागते. बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता एस.एम.ताजवे दीड महिन्यींपासून रजा टाकून गेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ कनिष्ठ अभियंता श्रीकांत साठे हे देखील महिन्यापासून रजेवर आहेत. आरोग्य निरीक्षक पी.एम. चव्हाण यांची अचानक टपाल विभागात बदली केल्याने कोपरगावकरांचे आरोग्य वा-यावर आहे.
तोकडा कर्मचारी वर्ग
नगरपालिकेत मुख्याधिकारी, सहायक कार्यालयीन पर्यवेक्षक, सहायक लेखापाल, बांधकाम नगर अभियंता, पाणी पुरवठा उपअभियंता, सहायक कर निरीक्षक, कनिष्ठ पर्यवेक्षक, ग्रंथपाल, कनिष्ठ विद्युत पर्यवेक्षक, सहायक खरेदी पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक, मार्केट लिपिक, आस्थापना लिपिक, सभा लिपिक, दप्तर लिपिक, आवक-जावक लिपिक, ग्रंथालय लिपिक, कनिष्ठ प्रोग्रामर, संगणक चालक, न्यायालय लिपिक, २ वैद्यकीय अधिकारी, राज्य उपजिवीका अभियान लिपिक असा तोकडा स्टाफ आहे.
प्रशासन चालविण्याची जबाबदारी मुख्याधिका-यांवर आहे. नवीन अभियंत्यांना तात्पुरत्या नियुत्या देण्याचा अधिकार त्यांना आहे. पण, कुठलीही गोष्ट गांभीर्याने घेतली जात नाही. ही त्यांची बेफिकिरी आहे. प्रशासनाच्या गलथानपणामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. पालिकेविषयी तक्रारी वाढून लोकप्रतिनिधी बदनाम होत आहेत. ठेकेदाराची बिले अदा न केल्याने पाणी पुरवठा जलवाहिनीचे ‘लिकेज’ निघत नाहीत. आरोग्य निरीक्षक पी.एम.चव्हाण यांची बदली केल्याचे मला माहीत सुध्दा केले नाही. मुख्याधिका-यांच्या मनमानीला अधिकारी व कर्मचारी कंटाळले आहेत.
-विजय वहाडणे, नगराध्यक्ष