रेखा जरे हत्याकांडातील मारेकरी गजाआड

By | Published: December 5, 2020 04:33 AM2020-12-05T04:33:50+5:302020-12-05T04:33:50+5:30

ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे (रा. श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (रा. राहुरी) व आदित्य सुधाकर चोळके (रा. कोल्हार ता. राहाता) ...

Rekha Jare murder killer Gajaad | रेखा जरे हत्याकांडातील मारेकरी गजाआड

रेखा जरे हत्याकांडातील मारेकरी गजाआड

ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे (रा. श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (रा. राहुरी) व आदित्य सुधाकर चोळके (रा. कोल्हार ता. राहाता) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. केडगाव (ता. नगर) येथील चौथ्या आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे समजते. याशिवाय मूख्य सूत्रधाराचा शोध पोलीस घेत आहेत.

रेखा जरे (वय ३०) या सोमवारी पुणे येथून आई, मुलगा व प्रशासकीय अधिकारी विजयामाला माने यांच्यासमवेत कारमधून नगरच्या दिशेन येत होत्या. नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाटा परिसरात रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांची कार अडवून हत्या केली. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित २४ तासांच्या आत तीन आरोपींना अटक केली तर चौथा आरोपी ताब्यात घेतला आहे. ज्ञानेश्वर व फिरोज या दोन आरोपींनी शिरूरपासून जरे यांच्या कारचा पाठलाग केला. जातेगाव फाटा परिसरात कार अडवून एक जण कारसमारे उभा राहिला व दुसऱ्याने त्यांच्या गळ्यावर वार केला. त्यानंतर हे दोघे घटनास्थळावरून पसार झाले, अशी माहिती पुढे आली आहे.

............

कट रचून झाले हत्याकांड

जरे यांची हत्या सुपारी देऊनच करण्यात आली, असा तपशील पुढे येत आहे. हत्येचा कट कोणी रचला व त्याची अंमलबजावणी कशी झाली? यासंदर्भातील माहिती पोलिसांनी उघड केलेली नाही. मुख्य सूत्रधार हा नगर शहरातील असून त्याने केडगाव येथील आरोपीला हत्याकांडाची सुपारी दिली. त्यानंतर केडगावच्या आरोपीने इतर तीन आरोपींच्या मदतीने ही हत्या घडवून आणली असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. नगरमधील मुख्य सूत्रधाराच्या नावापर्यंत पोलीस पोहोचले असल्याचीही माहिती आहे. आरोपींचे तसेच रेखा जरे यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचे कॉल डिटेल्स काढले जात आहेत. सुपा येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल हे सर्व या गुन्ह्याचा विविध अंगाने तपास करीत आहेत. मात्र, माध्यमांना अद्यापपर्यंत अधिकृत तपशील सांगण्यात आलेला नाही. पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे स्वत: पत्रकार परिषदेत गुन्ह्याची उकल करतील, असे अधिकारी सांगत आहेत.

...................

फोटोवरून लागला आरोपींचा सुगावा

जरे यांची कार अडविली तेव्हा एक आरोपी हा त्यांच्या कारसमोर उभा होता. याचवेळी जरे यांच्या मुलाने मोबाईलमधून त्याचा फोटा काढला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याच फोटोच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला तेव्हा तीन आरोपी कोल्हार परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री तिघांना अटक केली.

...................

सूत्रधाराच्या विरोधात मिळाले पुरावे

सुपारी देऊन जरे यांचे हत्याकांड घडवून आणणाऱ्या मुख्य सूत्रधाराचे नाव अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांना समजले आहे. यासंदर्भातील पुरावेही पोलिसांना मिळाले आहेत. मात्र,या सूत्रधाराला बुधवारी रात्री उशिरापर्यंत अटक झालेली नव्हती. आणखी सक्षम पुरावे हाती आल्यानंतरच मुख्य सूत्रधाराला अटक केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्य सूत्रधाराला अटक झाल्यानंतरच ही हत्या का करण्यात आली? ते कारण समोर येणार आहे.

Web Title: Rekha Jare murder killer Gajaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.