रेमडेसिविरच्या शोधात नातेवाईकांची परवड सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:18 AM2021-04-14T04:18:41+5:302021-04-14T04:18:41+5:30
अहमदनगर : कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा नगर शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. नव्या ...
अहमदनगर : कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा नगर शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. नव्या आदेशानुसार कोविड रुग्णालयांतच रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात मात्र कोविड रुग्णालयांच्या मेडिकलमध्येही इंजेक्शन नसल्याचे सांगितले जात असल्याने इंजेक्शन मिळविण्यासाठी नातेवाईकांची पायपीट सुरू आहे.
कोरोनावर प्रभावी म्हणून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिविरच्या इंजेक्शनच्या शोधासाठीची पायपीट नातेवाईकांच्या जीवावर बेतण्याची परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शनच्या शोधात शहरातील वेगवेगळ्या मेडिकलच्या पायऱ्या झिजवत आहेत. काहींनी तर पुणे येथून एक इंजेक्शन कसेबसे जमवले आहे. काहीजण रुग्णाला वाचविण्यासाठी ओळखीने परजिल्ह्यातून रेमडेसिविरचे इंजेक्शन मिळवित असून, एक इंजेक्शन मिळविण्यासाठी हजारो रुपये खर्ची पडत आहेत. अशातच प्रत्येक कोविड रुग्णालयाच्या मेडिकलमध्ये इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाईल, असा आदेश शासनाने काढला. मात्र, प्रत्यक्षात नगर शहरात अनेक ठिकाणी रेमडेसिविरचा पुरवठा झालेला नसल्याचे दिसून आले. शहरातील एका कोविड सेंटरमध्ये सोमवारी ३० रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची गरज होती. परंतु, दोन दिवसांत एकही इंजेक्शन उपलब्ध झालेले नव्हते. त्यामुळे तुम्हाला जिथे मिळेल तेथून घेऊन या, असे रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितले गेले. एका रुग्णाच्या नातेवाईकाने पुणे येथून एक इंजेक्शन आणले. काहींचे शेवटचे टप्प्याचे इंजेक्शन बाकी असून, काहींना पहिले इंजेक्शन मिळाले नाही. वेळेवर इंजेक्शन न मिळाल्यास रुग्ण वाचेल की दगावेल, या चिंतेने अनेकांच्या जीवाची धाकधूक सुरू आहे. यावरून शासनाने जरी आदेश काढला असला तरी प्रत्यक्षात इंजेक्शनचा पुरवठा झाला नसल्याचे दिसून येते.
....
शहरातील एका रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाला तातडीने रेमडेसिविर इंजेक्शन देण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. शहरातील सर्वच मेडिकल पालथे घातले. परंतु, एकही इंजेक्शन मिळाले नाही. शेवटी पुण्यातील नातेवाईकांना फोन लावला. दोन इंजेक्शन व्यवस्था होईल, असे सांगण्यात आले. तातडीने जाऊन दोन इंजेक्शन आणली व रुग्णालयात दिली.
- रुग्णाचे नातेवाईक