गोदावरी कालव्यांना तातडीने आवर्तन सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:19 AM2021-04-05T04:19:27+5:302021-04-05T04:19:27+5:30
मागच्या महिन्यात केलेले रब्बीचे आवर्तन लेट झाले होते. गहू, हरभरा, मका काढणीला आले असताना हे आवर्तन सुटले. पिके काढणीला ...
मागच्या महिन्यात केलेले रब्बीचे आवर्तन लेट झाले होते. गहू, हरभरा, मका काढणीला आले असताना हे आवर्तन सुटले. पिके काढणीला आली असताना काही शेतकऱ्यांनी पाणी घेतले नाही. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे उन्हाळी आवर्तन लवकर मिळेल, अशी अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना होती. मात्र, एप्रिल सुरू झाला तरीदेखील अजून पाटबंधारे विभागाने याबाबत गोदावरी कालव्यांना पाणी देण्याची तारीख निश्चित केली नाही. तेव्हा गोदावरी कालव्यांना पाणी कधी मिळेल, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सध्या शेतकऱ्यांचा ऊस, जनावरांचा चारा व भाजीपाला आदी पिके शेतात उभी आहेत. पूर्वी गोदावरी कालव्यांना पाणी सुटल्यानंतर लाभक्षेत्रातील चाऱ्या पूर्ण क्षमतेने वाहिल्या जायच्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील चाऱ्या सुटेल की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे.
पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना ७ नंबर फाॅर्म भरण्यासाठी आवाहन केले होते. त्याप्रमाणे तालुक्यातील शेतकऱ्यांनी सात नंबर फाॅर्मदेखील भरलेले आहेत. आता मात्र शेतकऱ्यांना फक्त गोदावरी कालवे कधी सुटतील हीच अपेक्षा आहे. पूर्वी जेऊर कुंभारी, चांदेकसारे, डाऊच खुर्द, कोकमठाण आदी मोठ्या परिसरात हरिसन ब्रँच ह्या चारीची मिनी कालवा म्हणून ओळख होती. गोदावरी कालवा सुटल्यानंतर टेलपर्यंत पाणी गेल्यानंतर लगेच हरिसन ब्रँच चारी सुटली जायची. मात्र, आता पाटबंधाऱ्याच्या नियोजनामुळे परिसरातील ही मिनी कालवा चारीदेखील काही काळच वाहिली जाते.
.............
पिकांची वाढ खुंटली
परिसरात पाणी पातळीत होणारी वाढ खुंटली आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. आता मात्र शेतकऱ्यांना गोदावरी कालव्यांच्या आवर्तनातून आतून पाणी मिळाले तरच शेतकऱ्यांची पिके वाचतील, अन्यथा पिके हातातून जातील आणि शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक टंचाईला सामोरे जावे. तेव्हा गोदावरी पाटबंधारे विभागाने तातडीने गोदावरी कालव्यांना उन्हाळी आवर्तन सोडावे, अशी मागणी वक्ते यांनी केली आहे.