उपायुक्तांच्या मध्यस्थीने आरोग्य कर्मचाऱ्यांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:22 AM2021-05-21T04:22:28+5:302021-05-21T04:22:28+5:30
महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना औरंगाबाद रोडवरील प्रशासकीय इमारतीत बैठक असल्याचा निरोप आला. शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर काम करणारे आरोग्य ...
महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना औरंगाबाद रोडवरील प्रशासकीय इमारतीत बैठक असल्याचा निरोप आला. शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर काम करणारे आरोग्य कर्मचारी घाईघाईत बैठकीला निघाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन आणि एक चालक, अशा चार जणांना सध्या चारचाकीतून प्रवास करण्याची परवानगी आहे. मात्र, मनपाच्या एका चारचाकीत चार, तर दुसऱ्या गाडीत पाच कर्मचारी बसलेले होते. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक चौकात महापालिका आरोग्य कर्मचाऱ्यांची वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली. आरोग्य कर्मचाऱ्यांची वाहने पोलिसांनी पकडल्याची माहिती उपायुक्त यशवंत डांगे व आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना मिळाली. उपायुक्त डांगे यांच्यासह बोरगे यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांशी चर्चा केल्याने वाहने सोडून देण्यात आली.
....
आरोग्य विभागातील कर्मचारी लसीकरणासाठी फिरत असतात. त्यांना महापालिकेकडून वाहने उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. बैैठकीसाठी हे कर्मचारी जात असताना त्यांना पोलिसांनी पकडले होते. परंतु, पोलिसांशी चर्चा केल्यानंतर वाहने सोडून देण्यात आली आहेत.
- यशवंत डांगे, उपायुक्त, मनपा
.....
आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याने महापालिकेची दोन वाहने पकडली होती. कर्मचाऱ्यांना समज देऊन वाहने सोडण्यात आली असून, याबाबतचा अहवाल आयुक्तांना पाठविण्यात येईल.
- विशाल ढुमे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर