पाणवठ्यात पाणी सोडल्याने प्राण्यांची भटकंती थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:18 AM2021-04-26T04:18:12+5:302021-04-26T04:18:12+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील शहजापूर येथील वनविभागाच्या वनातील कोरड्या ठाक असणाऱ्या पाणवठ्यात पाणी सोडल्याने वन्य प्राण्यांची पाण्यासाठीची भटकंती थांबली ...
सुपा : पारनेर तालुक्यातील शहजापूर येथील वनविभागाच्या वनातील कोरड्या ठाक असणाऱ्या पाणवठ्यात पाणी सोडल्याने वन्य प्राण्यांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे.
प्राणीमित्र व कॅरिअर मायडिया उद्योग समूहातील उत्पादन अधिकारी असणारे निलेश ढगे व त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी ढगे हे दरवर्षी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त वन्यप्राण्यांसाठी बनविलेल्या पाणवठ्यात पाणी सोडण्याची व्यवस्था करतात. उन्हाळ्याच्या साधारण मे व जून महिन्यात पावसाळा सुरू होईपर्यंत या पाणवठ्यात पाणी सोडण्याची व्यवस्था करीत असल्याचे माजी सरपंच अण्णासाहेब मोटे यांनी सांगितले. उन्हाळ्यात या भागातील पाण्याचे सर्व स्रोत आटतात. त्यामुळे या वनविभागात असणारे मोर, हरणे, ससे, कोल्हे, लांडगे, खोकड आदी वन्यप्राणी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करताना कधी कधी मानवी वसाहतीपर्यंत पोहोचतात. वनविभागाला पाणवठ्याची गळती थांबविण्यात अपयश आले. पाणी गळतीमुळे व तीव्र उष्णतेने आटून जाते. याबाबत त्यांना वरचे वर कळवूनही ते दखल घेत नसल्याची खंत मोटे यांनी व्यक्त केली. ढगे यांनी गतवर्षी ही टंचाई काळात पाणवठ्यात वन्यजीवांसाठी पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली होती. आठवडाभरानंतर महसूल विभागातील मंडलाधिकारी व माजी सैनिक नंदकुमार साठे यांच्यावतीने पाणवठ्यात पाणी सोडण्यात येणार असल्याचे ढगे यांनी सांगितले.
पाणवठ्याच्या दुरुस्तीबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे माजी सरपंच अण्णा मोटे यांनी सांगितले. यावेळी प्रवीण मगर, नंदकुमार साठे, ज्ञानेश्वरी ढगे, मंजू साठे, शंकर म्हस्के, वाघुंडे बुद्रूकचे माजी सरपंच संजय रासकर, अण्णासाहेब मोटे आदी उपस्थित होते उपस्थित होते.
-----
२५ सुपा पाणवठा
शहजापूर येथील वनातील पाणवठ्यात वन्यप्राण्यांसाठी पाणी सोडताना निलेश ढगे, नंदकुमार साठे, माजी सरपंच अण्णा मोटे, संजय रासकर व इतर.